जैवविविधता टिकवण्यासाठी नियम पाळून पर्यटन झाले पाहिजे
ग्रंथ महोत्सव परिसंवादात डॉ. मधुकर बाचुलकर यांचे प्रतिपादन
सातारा
धार्मिक ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, थंड हवेचे ठिकाणे, समुद्रकिनारे ही पर्यटन ठिकाणे आहेत. आपल्याकडे प्राणी व पक्षी अभयारण्य देखील आहेत. या ठिकाणची जैवविविधता टिकवायचे असेल तर सगळे नियम पाळून पर्यटन झाले पाहिजे, असे मत डॉ. मधुकर बाचुलकर यांनी व्यक्त केले.
सातारा येथे 24 व्या ग्रंथ महोत्सवानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित ‘ वाढते पर्यटन, ढासळते पर्यावरण’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या परिसंवादास उमेश झिरपे, आनंद सराफ, प्रा. संध्या चौगुले, ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, मुख्य समन्वयक आर. पी. निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मधुकर बाचुलकर म्हणाले, अलीकडच्या काळात पर्यटन हा मोठा व्यवसाय झालेला आहे त्यामुळे पर्यावरण ढासळत चाललेले आहेत. पर्यटनामधून शासनाला मोठा महसूल मिळतो. भारतामध्ये सध्या 20 टक्के वन तर महाराष्ट्रामध्ये 16 टक्के वन शिल्लक आहे. हेच प्रमाण ते 33 टक्के इतके हवे आहे. शासनाच्या विविध समित्यांवर मी कार्यरत आहे. मी पर्यावरणाच्या चळवळी केलेल्या आहेत व त्या यशस्वी झालेल्या आहेत.
आपल्याकडे प्राणी व पक्षी अभयारण्य यासारखी पर्यटन ठिकाणे आहेत मात्र आपल्या अतिरेकी वागण्यामुळे यामध्ये प्राणी व पक्षी येत नाहीत अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले,पर्यटनासाठी नियम कायदे आहेत. मात्र हे कायदे कोणाकडूनही पाळले जात नाही. सध्या माणसाची विचारसरणी बदललेली आहे, चंगळवाद बदललेला आहे. लोकसंख्या वाढलेली आहे. आर्थिक स्थिती बदललेली आहे. विविध प्रकारच्या सोयी सुविधा वाढलेल्या आहेत. हॉटेल लॉजिंग वाढली या सर्वामुळे प्लास्टिक कचरा वाढला.
सातारा जिल्ह्यातील कास पठाराला युनेस्को चा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आणि त्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली. पाचगणी पठारावर 12 नवीन वनस्पतींची नोंद केली, परंतु दुर्दैवानं आता तिथे 12 पैकी एकही वनस्पती सापडत नाही, अशी खंत डॉ. बाचुळकर यांनी व्यक्त केली. कास पुष्प पठारावर कुंपण घातल्यामुळे बारा वर्षानंतर पुष्प सौंदर्य नष्ट होत चाललेले आहे. या कुंपणा संबंधी मी ईमेलने पत्र पाठवल्यानंतर, तसेच काही पर्यावरण प्रेमींच्या जनरेट्यामुळे शासनाने ते कुंपण काढून टाकले.
उमेश झिरपे म्हणाले, गिर्यारोहण करताना पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याचे शिक्षण गिर्यारोहकाला दिले जाते. साहसी पर्यटन टोकाला गेलेले आहे. पर्यटन करणाऱ्या लोकांना निसर्गाचे पर्यावरणाचे काही देणे घेणे नाही. जगातले सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट वर सध्या ट्रॅफिक जाम होऊ लागलेले आहे. पर्यटनामधून रोजगार निश्चितपणे वाढतो, मात्र पर्यटनातून निसर्ग, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.
आनंद सराफ म्हणाले, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपण शासनावर ढकलून देतो, मात्र ही जबाबदारी आपल्यावरच येऊन पडलेली आहे. पर्यावरणाचे धडे अवतीभवतीच्या गोष्टीतूनच आपल्या ध्यानात येतात. जे लोक पर्यावरण पूरक वृक्षसंवर्धन करत आहेत त्याला फारशी प्रसिद्धी मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रा. संध्या चौगुले म्हणाल्या, आपल्या भारतामध्ये एका दिवसाला जेवढे टिश्यू पेपर वापरले जातात तेवढ्याने हजारो वृक्षांची तोड केली जाते, आपणाला माहिती नसते. पर्यावरणाची हानी कमीत कमी करण्याचे भान जेव्हा आपणाला येईल तेव्हा शाश्वत विकास होईल, असे मला वाटते. आपल्या भारत देशात शिस्तीसाठी कायदे, दंड करावे लागतात. शाश्वत विकासाची नीती करण्यासाठी आपण काय करू शकतो? याचा विचार केला पाहिजे. प्लास्टिकचा पुनर्वापर आपण केला पाहिजे. पर्यटन जितके आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात पर्यावरणीय भान आपण ठेवले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप श्रोत्री यांनी केले. आभार शिरीष चिटणीस यांनी मानले.