श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात मानवी हक्कांच्या प्रश्नांची मांडणी
डॉ. सविता नायक-मोहिते यांचं पुस्तकावरील चर्चासत्रात भारत सासणे यांचे मत
*सातारा:*
“श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमध्ये ग्रामीण भारतातील सरंजामशाही, जातीयवाद, महिलांचे शोषण आणि मानवी हक्कांचे प्रश्न प्रकर्षाने मांडले गेले आहेत. लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते यांनी ‘श्याम बेनेगल: एक व्यक्ती एक दिग्दर्शक’ या पुस्तकातून त्यांच्या या वैशिष्ट्यांवर योग्य प्रकाश टाकला असून, हे आशयघन पुस्तक नवोदित दिग्दर्शकांसाठी एक उत्तम शैक्षणिक मार्गदर्शक ठरेल,” असे उद्गार ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी काढले. येथील ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूह’ आणि ‘दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित’ यांच्या संयुक्त विद्यमाने दीप लक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात या पुस्तक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात श्री. सासणे बोलत होते. बेनेगल यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाचा पट बहुभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवादित करून प्रकाशित करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी लेखिकेला दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूहा’चे संस्थापक डॉ. संदीप श्रोत्री यांनी समूहाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. श्याम बेनेगल हे एक व्यक्ती आणि दिग्दर्शक म्हणून कसे मोठे होते, हे त्यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. सविता नायक-मोहिते यांचे हे पुस्तक केवळ दिग्दर्शकाचे आत्मचरित्र नसून, त्यांच्या चित्रपटांचा आणि दिग्दर्शकीय भूमिकेचा तो एक सखोल शैक्षणिक अभ्यास आहे, असे डॉ. श्रोत्री म्हणाले.
त्यानंतर ज्येष्ठ लेखक प्रा. बाळासाहेब लबडे यांनी बेनेगल यांच्या चित्रपटांमागची भूमिका उलगडताना ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘सरदारी बेगम’ आदी चित्रपटांचा विस्तृत आढावा घेत त्यातील कथाप्रसंग श्रोत्यांसमक्ष जिवंत केले. शबाना आजमी, नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील यांसारख्या कसदार कलावंतांना घडवण्यामध्ये बेनेगल यांची मोठी भूमिका होती, असे प्रा. लबडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नमूद केले.
महिलांच्या प्रश्नांवर सतत आग्रही भूमिका घेणाऱ्या ज्येष्ठ पर्यावरणवादी लेखिका ॲड. सीमंतिनी नुलकर यांनी बेनेगल यांच्या चित्रपटातील स्त्री आणि तिची बंडखोर वृत्ती यावर प्रकाश टाकला. विशेषतः ‘अंकुर’ चित्रपटातील कथानक, स्त्री व्यक्तिरेखा आणि अभिनय याविषयी त्यांनी विस्ताराने विश्लेषण केले. या प्रसंगी ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्रीराम नानल यांनी मुंबईतील ‘मेट्रो’ सिनेमा गृहात झालेल्या ‘अंकुर’ सिनेमाच्या प्रीमियर शोच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. हे पुस्तक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कलादृष्टीचा आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाचा अत्यंत अभ्यासपूर्ण वेध घेते, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात केले. तर, शिरीष चिटणीस यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा एकूण आढावा घेत श्याम बेनेगल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा भावपूर्ण उल्लेख केला.
पुस्तकाच्या लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास सांगताना, एका शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्ताने श्यामबाबू (बेनेगल) यांच्याशी झालेली पहिली भेट आणि त्यानंतर सुरू झालेली लेखनप्रक्रिया यावर प्रकाश टाकला. आपल्या वैद्यकीय पेशाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, “आम्ही डॉक्टर मंडळी एंडोस्कोपी, ईसीजी, एक्स-रे अशा विविध मार्गांनी रुग्णाचे शरीर तपासतो; पण त्याने माणसाचे ‘मन’ दिसत नाही. माणसाचे हे अंतरंग बघण्याचे आणि तपासण्याचे काम साहित्य करते.” त्यांच्या या उद्गारातून त्यांचे साहित्यावरील निस्सीम प्रेम दिसून आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. संदीप श्रोत्री यांनी भारत सासणे यांचे, तर श्रीराम नानल यांनी प्रा. बाळासाहेब लबडे यांचे स्वागत केले. अध्यक्ष या नात्याने भारत सासणे यांनी लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते, ॲड. सीमंतिनी नुलकर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सविता कारंजकर यांनी केले. साताऱ्यात अशा एका दर्जेदार आणि आगळ्यावेगळ्या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित रसिक सातारकरांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.
फोटो ओळ
चर्चासत्राचे उद्घाटन करताना भारत सासणे,डावीकडून शिरीष चिटणीस, सविता कारंजकर, श्रीराम नानल, संदीप श्रोत्री, विनोद कुलकर्णी, बाळासाहेब लबडे, सविता नायक मोहिते व सीमंतिनी नुलकर

