शं.मा. डिंगणेः चालता बोलता आदर्श
पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, बृह्न मुंबई मुख्याध्यापक संघ आणि राष्ट्रपती महोदय श्री. ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मिळालेला आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार तसेच विविध सामाजिक संस्थांकडून आदर्श नागरिक म्हणून मिळालेले पुरस्कार प्राप्त श्री. शंकरराव मारूती डिंगणे यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. सरांच्या रूपातील एक चालता बोलता आदर्श कालवश झाला आहे.
वाळवे तालुक्यातील मांगले या छोट्याशा गावी साळी समाजात जन्मलेल्या डिंगणे यांच्या घरी खूप द्रारिद्रय होते. त्यांचे मामा श्री. शंकरराव महादार यांनी डिंगणे यांना वयाच्या आठव्या वर्षी सातारा येथे आणले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगमध्ये दाखल केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रत्यक्ष सहवास डिंगणे यांना लाभला. सेवा, त्याग, सर्वधर्म समभाव, स्वालंबन आणि देशप्रेम अशा संस्कारांचा परिसस्पर्श बाल डिंगणे यांना झाला आणि डिंगणे यांचे जीवनच बदलून गेले. ‘कमवा आणि शिका’ ही कर्मवीर अण्णांची जगाच्या शिक्षण क्षेत्राला दिलेली अमूल्य देणगी आहे. याचा लाभ विद्यार्थी आवस्थेत श्री. डिंगणे यांनी घेतला. सुट्टीच्या दिवशी गंवड्याच्या हाताखाली रोजगारही केला. एम.ए., एम.एड. झालेल्या डिंगणे यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये आजन्म नोकरी करण्याचे ध्येय बाळगून ४ वर्षे उपशिक्षक आणि ३० वर्षे मुख्याध्यापक अशी सेवा केली. इतर मान्यवर संस्थांनी निमंत्रित करूनही ते रयत शिक्षण संस्थेशी आणि कर्मवीर अण्णांच्या विचाराशी एकरूप-एकनिष्ठ राहिले.
‘कर्मवीर’ पुरस्काराचे मानकरी
रयत शिक्षण संस्थेतून दिल्या जाणाऱ्या ‘कर्मवीर’ पुरस्काराचे श्री. डिंगणे हे पहिले मानकरी होते. रयत शिक्षण संस्थेचे एके वेळचे अध्यक्ष दानशूर बंडोगोपाळा मुकादम यांच्या नावाने दिला जाणारा महाराष्ट्र पातळीवरील ‘मुकादम साहित्य पुरस्कार’ श्री. डिंगणे यांनी कै. पतंगराव कदम यांच्या जीवन कार्यावर लिहिलेल्या पुस्तकास मिळाला होता हेही महत्वाचे आहे. रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य, भारती विद्यापीठाचे मार्गदर्शक म्हणून त्यांना मिळालेले मोठेपण वास्तववादीच आहे.
कै. श्री. डिंगणे हे सामाजाशी एकरूप झालेले आदर्श मार्गदर्शकही होते. हडपसर येथील साधना सहकारी बँक, साधना गृहरचना सहकारी सोसायटीच्या स्थापनेतही त्यांचा मौलिक वाटा होता. भारती विद्यापीठ आणि भारती सहकारी बँकेच्या निर्मितीतही डिंगणे यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. हडपसर, पुणे येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या विकासात त्यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले आहे. ‘समाज’ म्हणजे केवळ बहुजनांची वसाहत अथवा गर्दी नाही, ह्या वसतीमधील प्रत्येकास दुसऱ्या विषयी आपूलकी, प्रेम, जिव्हाळा संवेदना याची जाणीव असली पाहिजे. ‘माणूस धर्माची’ शिकवण देणारे शं. मा. डिंगणे हे समाजाचे आदर्श मार्गदर्शक होते. एकेवेळी फाटके कपडे घालून शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी कर्मवीर अण्णांच्या वसतीगृहात आलेल्या डिंगणे यांनी काही वर्षांपूर्वीच रयत शिक्षण संस्थेचे तत्कालिन चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हाती संस्थेला देगणी म्हणून पाच लाख रूपयांचा चेक सुपूर्त केला होता. ऋण फेडण्याची भावना हीच आदर्श कुटूंब आणि आदर्श समाज घडविण्याची प्रक्रिया असते.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी अस्त्र आहे हे डिंगणे सरांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होते. अठरा विश्व दारिद्र असलेल्या घरातील डिंगणे यांनी शिक्षण घेऊन आपले कुटूंबही कौतुकास्पद साकारले. मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे सर्वच उच्च शिक्षित आहेत. काही नातवंडांनी परदेशात शिक्षण घेतले. डिंगणे सरांच्या संस्कारातून कौंटुबिक जाणीवा जशा रूजविल्या तशा सामाजिक संवेदनाही रूजविल्या गेल्या. कौटुंबिक आणि सामाजिक जाणीवा व संवेदना जगलेल्या शं. मा. डिंगणे यांचा आदर्श पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल !
लेखक, प्रा.जे.पी. देसाई (साहित्यिक व प्रख्यात वक्ते)
पुणे-४११ ०२८ संपर्क : ९४२३५२८७६६

