अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी
ग्रंथ महोत्सवातील परिसंवादामध्ये मान्यवरांचा सूर
सातारा
मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आता ही मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याचे आव्हान पेलायला हवे अशी अपेक्षा ग्रंथ महोत्सवात झालेल्या परीसंवादात विविध मान्यवरांनी व्यक्त केली
येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित ग्रंथ महोत्सवामध्ये आपली मराठी भाषा अभिजात झाली आता वाटचाल कशी होणार या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते त्यांच्यासह पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे,दैनिक लोकमतचे दीपक शिंदे,दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे मराठी राजभाषा विभागाच्या उपायुक्त अंजली ढमाळ आणि सूत्रसंचालक ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी सहभाग घेतला होता
ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह शिरीषचिटणीस यांच्या हस्ते सर्व उपस्थितितांचा सत्कार करण्यात आला
परीसंवादाची सुरुवात करताना विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याची माहिती दिली आणि आगामी कालावधीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो निधी उपलब्ध होणार आहे त्याचा योग्य विनियोग करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले
हरीश पाटणे यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी भाषेच्या विकासामधील माध्यमांची भूमिका स्पष्ट केली आणि आगामी कालावधीमध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी संघर्ष करावा लागला तरी आम्ही तयार आहोत असे सांगितले दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यास सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
दीपक शिंदे यांनी मराठी भाषेच्या विविध बोलीभाषा असून दर बारा कोसांवर भाषा बदलत असल्याने या सर्व भाषांचा सन्मान करावा लागणार आहे असे सांगितले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या सर्व मराठीच्या बोलीभाषांचा विचार यानिमित्ताने केला जावा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली श्रीकांत कात्रे यांनीही आपल्या भाषणामध्ये मराठीला व्यावहारिक दर्जा मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जोपर्यंत दैनंदिन व्यवहारामध्ये आपण मराठी शब्दांचा वापर करत नाही तोपर्यंत इतर भाषांचे मराठी भाषेवर झालेले आक्रमण कमी होणार नाही असे त्यांनी सांगितले
अंजली ढमाळ म्हणाल्या, मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून व्यावहारिक भाषा म्हणून आणि प्रशासकीय भाषा म्हणून महत्त्व मिळण्याची गरज आहे आज इंग्रजी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे कारण ती ज्ञानभाषा आणि व्यावहारिक भाषा म्हणून विकसित झाली आहे आता मराठी भाषेला सुद्धा तोच टप्पा गाठण्याची गरज आहे मराठी भाषा मुळापासूनच अभिजात होती फक्त आता त्याला दर्जा द्यायला दिल्यामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे साहजिकच या निमित्ताने सरकारी पातळीवर ज्या सुविधा आणि निधी मराठी भाषेच्या विकासासाठी उपलब्ध होतील त्याचा योग्य आणि पर्याप्त वापर करण्याचे आव्हान आता आपल्याला पेलावे लागणार आहे
मुकुंद फडके यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले त्यांनीही मराठी भाषा जोपर्यंत ज्ञानभाषा म्हणून विकसित होत नाही आणि व्यवहारभाषा म्हणून वापरली जात नाही तोपर्यंत या भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण थांबणार नाही असे सांगितले मराठी भाषेच्या विकासासाठी चित्रपट नाट्य साहित्य आणि प्रसारमाध्यमे या सर्वांचेच योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
वि ना लांडगे यांनी आभार मानले
फोटो ओळ
परिसंवादात बोलताना अंजली ढमाळ,शेजारी मुकुंद फडके,श्रीकांत कात्रे,दीपक शिंदे ,विनोद कुलकर्णी,हरीश पाटणे आणि वि ना लांडगे

