मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का
बार्शीमध्ये मराठा समाज करणार विरोधात आंदोलन
मुंबई
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत.
परंतु दुसरीकडे ओबीसी समजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे. सोलापुरात बार्शी तालुक्यातील मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत.
मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना 11 प्रश्न विचारण्यात आले होते, मात्र त्याची उत्तरे न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे, एकीकडे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना या आंदोलनामुळे हा संघर्ष आता आणखी वाढणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का?महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या मनोज दादा यापूर्वी मराठा मुस्लिम वाद, मराठा दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे, त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा.देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? असे काही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आले आहेत. मात्र याचं उत्तर न मिळाल्यानं आंदोलन करण्यात येणार आहे.

