स्क्रीनच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृतीला आव्हान
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या संमेलनात विचारममंथन
सातारा,
डिजिटल क्रांतीच्या युगात मोबाईल, संगणक आणि टीव्ही स्क्रीनचे वाढते आक्रमण वाचन संस्कृतीपुढे मोठे आव्हान निर्माण करत असून, मुद्रित पुस्तकांचे वाचन आणि स्क्रीनवरील वाचन यातील तफावत वाढत असल्याची चिंता साहित्यिक आणि विचारवंतांनी व्यक्त केली. आम्ही पुस्तक प्रेमी समूह, सातारा आयोजित चतुर्थ साहित्य संमेलनात ‘वाचन संस्कृती…. पुस्तकातून स्क्रीनकडे’ या विषयावरील परिसंवादात ही बाब अधोरेखित झाली.
कै. शिवाजीराव भोसले साहित्यनगरी येथील कै. मधुसूदन नेने व्यासपीठावर दुपारी २ ते ३:३० या वेळेत झाले. वक्ते म्हणून श्रीकांत कात्रे, डॉ. सविता मोहिते, मुकुंद फडके वैशाली राजमाने आणि शिरीष चिटणीस यांनी आपले विचार मांडले.





परिसंवादात बोलताना श्रीकांत कात्रे यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात मोबाईल, संगणक आणि टीव्ही स्क्रीनचा वापर अत्यंत वाढला असून, २५ वर्षांपूर्वी वर्तमानपत्रे, पुस्तके आणि मासिकांचे सखोल वाचन होत असे, परंतु स्क्रीनच्या प्रभावामुळे या वाचनावर मर्यादा आल्या आहेत. मुद्रित माध्यमांमधील वाचनामुळे मनन आणि चिंतन करण्याची संधी मिळते, ज्याद्वारे आपली भाषा आणि संस्कृती जपली जाते. स्क्रीनवर माहिती व चित्रे वेगाने बदलत असल्यामुळे पहिल्या सेकंदाला पाहिलेले दुसऱ्या सेकंदाला आठवत नाही आणि विचारांची सखोलता राहत नाही, असे ते म्हणाले.
पत्रकारिता क्षेत्रात एआय (AI) च्या माध्यमातून बातम्या तयार करताना काम वेगाने होत असले, तरी यांत्रिक पद्धतीमुळे बातमीतील जिवंतपणा आणि मानवी भावना कमी होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. स्क्रीनचा वेळ (स्क्रीन टाईम) कमी करून पुढील पिढीला मुद्रित माध्यमांकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न आणि उपाययोजना करण्याची गरज असून, आयुष्यातील व वाचनातील जिवंतपणा टिकवण्यासाठी पुस्तकांचे महत्त्व कायम ठेवणे आवश्यक असल्याचा सूर त्यांनी लावला.
वैशाली राजमाने यांनी वाचन संस्कृतीपुढील आव्हाने आणि स्थित्यंतरावर प्रकाश टाकला. २१ व्या शतकातील डिजिटल क्रांतीमुळे मुद्रित पुस्तकांची जागा मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनने घेतली असून, कानाला मोबाईल आणि डोळ्यांसमोर लॅपटॉप अशी नवी वाचन संस्कृती उदयास आली आहे. मात्र, वाचन संस्कृती ही नष्ट होणारी नसून ती निरंतर आहे; सध्याचा काळ हा वाचन संस्कृतीतील बदलाचा आणि उत्क्रांतीचा काळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल स्क्रीन वाचनाचे फायदे सांगताना त्या म्हणाल्या की, एका क्लिकवर जगाच्या पाठीवरील कोणतेही दुर्मीळ साहित्य आणि पुस्तके घरबसल्या उपलब्ध होतात; त्यासाठी ग्रंथालयात किंवा दुकानात जाण्याची अट उरलेली नाही. किंडल किंवा ई-रीडरमुळे प्रवासात हजारो पुस्तके मोबाईलमध्ये सोबत नेणे शक्य झाले असून, छापील पुस्तकांच्या निर्मितीच्या तुलनेत ई-बुक्सची किंमत कमी असते. वाचकांना गरजेनुसार फॉन्टचा आकार लहान-मोठा करणे आणि अंधारात डार्क मोड वापरणे शक्य होते. कागदाचा वापर टळल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते, तसेच ‘शोधगंगा’ आणि ‘डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया’ यांसारख्या प्लॅटफॉर्म्समुळे घरबसल्या संशोधनासाठी दुर्मीळ संदर्भ व रिसर्च पेपर्स उपलब्ध होतात, असे त्या म्हणाल्या.
मात्र, स्क्रीन वाचनाचे तोटे आणि आरोग्यविषयक चिंताही त्यांनी मांडल्या. स्क्रीनवरील वाचन हे उथळ असते आणि ते बुद्धी किंवा मनापर्यंत सखोल पोहोचत नाही; याउलट पुस्तकांचे वाचन हे सखोल आणि तादात्म्य पावणारे असते. खोलवर वाचनाची सवय सुटल्याने वाचकांची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, निर्मिती क्षमता आणि विचार करण्याची क्षमता कमी होत आहे. स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार, मानदुखी आणि निद्रानाशाचा त्रास होतो. रात्री मोबाईल पाहिल्याने झोप उडते, तर हातात घेतलेले पुस्तक शांत झोप देते. एआय किंवा चॅटजीपीटीवर मिळणाऱ्या माहितीची सत्यता ठामपणे पडताळता येत नाही, तर पुस्तकातील माहिती संशोधनावर आधारित असल्याने विश्वसनीय असते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सविता मोहिते यांनी बदलाचा स्वीकार आणि जाणीवपूर्वक निर्णय यावर भर दिला. जीवनात बदलाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसून, तंत्रज्ञान आणि वाचनाच्या बाबतीत आपण जाणीवपूर्वक जे निर्णय घेतो, तेच आपल्या वैयक्तिक आयुष्याला आणि समाजाच्या जडणघडणीला दिशा देतात, असे त्या म्हणाल्या.
भौतिक पुस्तक हातात घेतल्यावर त्याचा स्पर्श, नवीन पुस्तकाचा वास आणि जुन्या पुस्तकात सुकलेल्या पानांसोबत जपलेल्या आठवणी यातून वाचकाचे पुस्तकाशी एक अतुट भावनिक नाते तयार होते. याउलट, स्क्रीनवरील वाचन हे केवळ एक ‘सर्च’ आहे; त्याला स्पर्श, वास किंवा गंध नसतो आणि तेथील प्रतिक्रिया केवळ आभासी ‘थम्ब्स अप’पुरत्या मर्यादित राहतात, असे त्यांनी सांगितले.
भविष्यात डेटा सेंटर्सच्या मालकीवरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. एआय आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे व्यक्तिस्वातंत्र्य व साचेबद्ध विकास नियंत्रित केला जाण्याचा धोका असल्याचे त्या म्हणाल्या. तंत्रज्ञानाचा वापर सुरीसारखा आहे; त्याने शस्त्रक्रियाही होऊ शकते आणि खूनही. त्यामुळे “वाचन हे साधन आहे, साध्य नव्हे” हे ओळखून आत्मभान, सर्वांगीण विकास आणि समाजाची उन्नती साधणे हेच वाचनाचे ध्येय असले पाहिजे. विघातक तंत्रज्ञान रोखण्यासाठी चांगल्या विचारांच्या लोकांचा संघटनात्मक समूह पुढे येणे गरजेचे असून, “वाचा, कुठूनही वाचा; पण समाजाच्या कल्याणासाठी वाचा,” असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला.
मुकुंद फडके यांनी स्क्रीनचा ‘ग्रॉस टाईम’ आणि वाचनाचा प्रत्यक्ष वेळ यावर भाष्य केले. आज UPI पेमेंट, वीज बिल, ऑनलाईन खरेदी (उदा. ब्लिंकिट, झोमॅटो) या सर्व दैनंदिन कामांसाठी स्क्रीनचा ‘ग्रॉस टाईम’ प्रचंड वाढला आहे. लोक स्क्रीनवर भरपूर वेळ घालवतात, परंतु त्यातील नक्की किती वेळ पुस्तके किंवा वैचारिक साहित्य वाचण्यासाठी वापरला जातो, याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा विचार मांडताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘साध्य’ (उद्दिष्ट) महत्त्वाचे असते, ‘साधने’ (माध्यम) कोणतीही असू शकतात. ‘श्यामची आई’सारखे संस्कारयुक्त विचार किंवा पुस्तकातील विचार वाचकांपर्यंत पोहोचणे हे मुख्य साध्य आहे; मग ते भौतिक पुस्तकातून पोहोचो किंवा ई-बुक किंवा स्क्रीनवरून.
कोविड कालावधीत शाळा, क्लासरूम आणि अभ्यास ऑनलाईन झाल्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देणे पालकांसाठी अपरिहार्य झाले. कोविडनंतरच्या काळात वृत्तपत्रांचा छापील खप ५० टक्क्यांनी कमी झाला आणि वृत्तपत्रांनाही ऑनलाईन आवृत्त्यांकडे वळावे लागले. तंत्रज्ञान ज्या वेगाने वाढत आहे, त्या वेगाने मानवी शहाणपण वाढत नाही; त्यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्वी गरिबीचे किंवा साधेपणाचे लक्षण मानला जाणारा ‘गुळाचा चहा’ किंवा ‘चुलीवरचे जेवण’ आज जाणीवपूर्वक आणि प्रेमाने हॉटेल्समध्ये ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून स्वीकारले जाते. जग गोल असल्याने वाचन संस्कृतीही पुन्हा पुस्तकांकडे येईल; भविष्यात “मी मोबाईल बघत नाही, मी पुस्तक वाचतो/वाचते” हे उच्च अभिरुचीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण बनेल. विमानात सर्व ४० प्रवासी टॅब व लॅपटॉपवर व्यस्त असताना पुस्तक वाचणाऱ्या एका मुलीचे उदाहरण देत त्यांनी भविष्यात मुद्रित पुस्तकांचा गौरव वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
कपाटात पुस्तके ठेवण्यास जागा नसल्यास डिजिटल माध्यमातून गडकरींचे समग्र वाङ्मय, महात्मा फुलेंचे साहित्य, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि तुकाराम गाथा सहज उपलब्ध होतात. तरुण पिढीला स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवणे शक्य नसले, तरी त्यांना वाचलीच पाहिजेत अशा महत्त्वाच्या ‘मस्ट रीड’ पुस्तकांची यादी देऊन वाचनाची सवय लावली पाहिजे. छापील पुस्तक हे लेखकाच्या अस्मितेचा भाग असते, पण डिजिटल वितरणानेही विचारांचा प्रसार होतो. वाचन संस्कृतीची अजून विकृती झालेली नाही, ती संस्कृतीच आहे. “गुळाच्या चहाप्रमाणे” लोक पुन्हा मुद्रित पुस्तकांकडे परततील आणि वाचन संस्कृती अधिक समृद्ध होईल, असा ठाम आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शिरीष चिटणीस यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना, अभिजात साहित्याची निर्मिती करणे आणि भाषेच्या समृद्धीसाठी योगदान देणे हे साहित्यिक व अभ्यासकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. ‘आम्ही पुस्तक प्रेमी संवाद’ हा संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आणि वैचारिक समृद्धी जपणारा समूह असून, या समूहातील सदस्यांनी मराठी भाषेचा आणि साहित्याचा विस्तार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.मुंबई-पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरांमध्येही पुस्तकांची नियमित दुकाने बंद होत आहेत. पुण्यातील ‘उत्कर्ष प्रकाशना’सारख्या ठिकाणी प्रदर्शनांना प्रतिसाद मिळतो, पण दुकानात जाऊन नियमित पुस्तक खरेदी करणाऱ्यांची संख्या घटली आहे. साताऱ्यामध्ये पुस्तकाचे स्वतंत्र दुकान टिकवणे कठीण झाले असून ग्राहकांच्या अभावामुळे स्वतःचे पुस्तकांचे दुकान बंद करावे लागल्याचा खंतजनक अनुभव त्यांनी मांडला. तरीही साताऱ्यात पुस्तकांचे किमान एक तरी स्वतंत्र दुकान असावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
चतुर्थ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘वाचनातून समृद्धी’ ही संकल्पना अधोरेखित झाली. हॉटेल निवांत, यवतेश्वर, सातारा येथे झालेल्या या संमेलनात वक्त्यांनी स्क्रीनचा वापर कमी करून मुद्रित माध्यमांकडे वळण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल आणि विनोद कुलकर्णी यांच्यासह पुस्तकप्रेमींची उपस्थिती होती.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले, तर आभार जयंत देशपांडे यांनी मानले.

