मन वढाय वढाय
न्यूजमंडी/पॉझिटिव्ह

घरगुती कामे करून कॅन्सरला दूर पळवा
दररोज दम लागेपर्यंत कामे करणे फायदेशीर
वॉशिंग्टन
आधुनिक काळामध्ये सर्वांची जीवनशैली बदलून गेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकारासह कर्करोगाचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे आता एका नवीन संशोधनाप्रमाणे दररोज घरातलीच कामे करून तुम्ही कर्करोगाला दूर ठेवू शकता दररोज दम लागेपर्यंतअसे किमान एक जरी काम केले तरी कर्करोगाचा धोका 20 टक्क्याने कमी होतो असे या संशोधन अहवालात म्हटले आहे सर्वसाधारणपणे आधुनिक काळात लोक फिट राहण्यासाठी एखाद्या जिममध्ये जात असतात किंवा घरी व्यायाम करत असतात पण असे जर कोणाला शक्य होत नसेल तर दररोज घरात केली जाणारी कामेच त्यांना फिट ठेवू शकतात कोणत्याही व्यक्तीने किमान दिवसातून असे एक काम केले ज्यामुळे त्यांना खूप दम लागला तरी ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे या अहवालात म्हटले आहे द कन्वर्सेशन जर्नल नावाच्या आरोग्य विषयक नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने दिवसभरात किमान चार ते पाच मिनिटे अशा प्रकारे शरीर दमवणारे घरगुती काम केले तर त्याला आरोग्याचा फायदा होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे हे संशोधन ब्रिटनमध्ये झाले असून त्यामध्ये 22,000 पेक्षा जास्त लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला या 22 हजार लोकांमध्ये 55% महिला होत्या तर 2000 असे लोक होते ज्यांना कधीही आत्तापर्यंत कर्करोग झालेला नाही तसेच या लोकांपैकी बहुतेक लोक दिवसभरात फक्त दोन ते अडीच मिनिटेच घरगुती काम करत होते ज्या लोकांना कोणत्याही जिममध्ये जाणे किंवा व्यायाम करणे आवडत नाही आणि घरीच व्यायाम करणे त्यांना पसंत नसते अशा लोकांनी दररोजच्या घरगुती कामांना जर प्राधान्य दिले आणि त्यामध्ये शरीर दमवणारी कामे केली तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो असे या संशोधनात म्हटले आहे

न्यूजमंडी/ज्ञानकोश
अविश्वास ठराव
पहिल्यांदा अविश्वास ठराव तिसऱ्या लोकसभेत म्हणजे 1963 साली आचार्य जे. बी. कृपलानी यांनी जवाहरलाल नेहरू सरकारविरोधात आणला होता.
त्यावेळी पंतप्रधान नेहरू 4 दिवसांच्या चर्चेनंतर म्हणाले होते, “ही चर्चा खूप रंजक होती, आणि माझ्यामते फायद्याचीसुद्धा. वैयक्तिकरीत्या मी या प्रस्तावाचं आणि या चर्चेचं स्वागतच केलं. मला वाटतं की वेळोवेळी अशा परीक्षा झाल्या तर चांगलंच होईल.”नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री यांना तीन तर इंदिरा गांधींच्या सरकारला एकूण 15 अविश्वास प्रस्तावांना सामोरं जावं लागलं होतं. पण कुठल्याही प्रसंगी सरकार पडलं नाही.ते पहिल्यांदा पडलं 1979 साली, जेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधान मोरारजी देसाईंविरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावर 9 तासांची चर्चा झाली, पण ऐन मतदानापूर्वीच देसाईंनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.तेव्हापासून राजीव गांधी सरकारविरोधात एकदा, पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात दोन वेळा अविश्वास ठराव आणला गेला. पण सरकार खाली खेचण्यात विरोधकांना यश आलं नाही.पण 1990 साली व्ही. पी. सिंहांचं सरकार 11 महिन्यांतच अशाच अविश्वास प्रस्तावानंतर कोसळलं. त्यानंतर 1997 साली एच डी देवेगौडा यांचं सरकार 10 महिन्यात असंच कोसळलं होतं. अविश्वास ठरावाच्या बाबतीत अटल बिहारी वाजपेयींचा रेकॉर्ड 50:50 आहे. याबाबतीत अटल बिहारी वाजपेयींचा रेकॉर्ड 50:50 आहे. त्यांच्या सरकारांविरोधात दोन वेळा अविश्वास ठराव आला होता – एकदा 1999 साली, जेव्हा जयललितांच्या AIADMKने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, आणि ऐनवेळी मायावतीसुद्धा मागे हटल्या. तेव्हा सरकार अवघ्या एका मतामुळे पडलं होतं. तर दुसऱ्यांदा 2003 साली त्यांच्या सरकारविरोधात सोनिया गांधींनी अविश्वास ठराव आणला होता. पण सरकारच्या बाजूने 312 तर विरोधात 186 मतं पडली होती, आणि ते सरकार 2004च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाचलं होतं.अशा प्रकारचा 27वा ठराव 2018 साली नरेंद्र मोदी सरकारविरोधात तेलुगु देसम पक्षाने आणला होता, ज्यात सरकारच्या बाजूने 325 मतं तर विरोधात 126 मतं पडली होती.

न्यूजमंडी/सुविचार
१. लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात.
२. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.
३. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्य खुप आनंदात जाईल.

न्यूजमंडी/विनोद
मग बसू
वैभव पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
वैभव : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !!
मावशा
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो..
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर,
त्या तुझ्या मावश्या आहेत..
नवरा
जो नेहमी हसत असतो त्याला
HAS MUKH म्हणतात…
आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला
HUS BAND म्हणतात

न्यूजमंडी/खाद्ययात्रा
नारळी भात
साहित्य
एक पूर्ण खोवलेला नारळ.दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम.तूप 4 चमचे किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा).लवंगा 2-4. जायफळ किसून अर्धा चमचा. सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम.
कृती
तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध.
मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दूध काढायचं. हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा. अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते. आता तुपावर 2-4 लवंगा टाकायच्या. गॅस बारीक ठेवा. त्यात बदामाचे काप घाला. बदामाचा खमंग वास आला की त्यात तांदूळ टाकायचे. छान लालसर परतून घ्यायचे. मंदाग्निवर.आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं. आता गॅस बारीक करून जाड दूध टाकायचं, वर दोन वाट्या पाणी घालायचं. छान उकळी आली की, झाकण ठेऊन भात बोटमोड्या शिजवून घ्यायचा. (पाण्याचे प्रमाण तांदुळ कोणता आणि तुम्हाला कसा भात आवडतो त्यानुरुप कमी जास्त करा. पण भात अगदी नीट शिजल्याशिवाय पुढे जाऊ नका)भात पूर्ण शिजला की,भांड्या खाली तवा ठेवा, गॅस बारीकच असू द्या. तांदळाच्या समप्रमाणात किसलेला गूळ टाकायचा, जायफळ किसून घालायचं. आणि उलथण्याच्या उलट्या बाजुने हलकेच हलवायचा. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे हे हलवणं सोपं जाईल. गूळ सगळीकडे मिसळला की पुन्हा झाकण घालून एक वाफ येऊ देत.तयार आहे नारळी भात. यात नारळाचा चोथा नसल्याने हा भात अतिशय सुरमट होतो. दुसऱ्या दिवशी तर हा नारळीभात अफलातून लागतो नारळाचा जो चोथा उरेल तो चेहरा धुताना स्क्रबर म्हणून वापरायचा. किंवा थोड्या पाण्यात वाटून केसांना लावायचा, 15 मिनिटांनी केस धुवायचे. चेहरा नितळ, केस चमकदार होतात.
