तिसऱ्यांदा पुष्पकचे यशस्वी लँडिंग
इस्रोची आणखी एक यशस्वी कामगिरी
बेंगळुरू
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी आणखी एक मोठा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. रीयुजेबल लॉन्च व्हेईकल पुष्पकचे सलग तिसरे यशस्वी लँडिंग केले.पुष्पक विमानाची चाचणी सकाळी 7.10 वाजता कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील एअरोनॉटीकल टेस्ट रेंज मध्ये करण्यात आले.तिसऱ्या चाचणीत, लाँच व्हेईकल उंचावरून सोडण्यात आले आणि जोरदार वारे वाहत होते, तरीही प्रक्षेपण वाहन ‘पुष्पक’ ने पूर्ण अचूकतेने धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले.
या चाचणीत इस्रोने लँडिंग इंटरफेस आणि विमानाच्या लँडिंग परिस्थितीची उच्च वेगाने तपासणी केली. या चाचणीसह, इस्रोने आजच्या काळातील सर्वात महत्वाचे तंत्रज्ञान साध्य करण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान जगात फक्त इस्रोकडे आहे.
चाचणीदरम्यान पुष्पक हे प्रक्षेपण वाहन हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर प्रक्षेपण वाहन पुष्पकने स्वायत्त पद्धतीने धावपट्टीवर यशस्वी लँडिंग केले. लँडिंग दरम्यान वाहनाचा वेग ताशी ३२० किलोमीटर होता. लँडिंगच्या वेळी व्यावसायिक विमानाचा वेग ताशी २६० किलोमीटर आणि लढाऊ विमानाचा वेग सुमारे २८० किलोमीटर प्रति तास असतो. लँडिंगच्या वेळी प्रथम ब्रेक पॅराशूटच्या मदतीने प्रक्षेपण वाहनाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत कमी करण्यात आला आणि त्यानंतर लँडिंग गिअर ब्रेकच्या मदतीने विमान धावपट्टीवर थांबवण्यात आले.
