आव्हाड यांना तात्काळ अटक करा – उमेश पाटील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान केला
मुंबई
मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार आहेत असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर शरद पवार तुम्ही काय कारवाई करणार आहात याचे उत्तर आंबेडकरी जनतेला दिले पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली.
मनुस्मृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला मान्य नाही. परंतु ज्या पद्धतीची नौटंकी जितेंद्र आव्हाड करत आहेत. त्यांचा मनाचे श्लोक, भगवद्गीता यापैकी नेमका कशाला विरोध आहे. मनुस्मृतीला की, भगवद्गीतेला विरोध आहे की, समर्थ रामदासांना विरोध आहे. जितेंद्र आव्हाड यांचा समर्थ रामदासांना विरोध आहे असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला.
शालेय शिक्षणात मुल्यशिक्षणाला महत्व आहे. मुल्यशिक्षणाचे गांभीर्य पुण्यातील दुर्घटनेवरुन लक्षात येते.भगवद्गीतेचा समावेश शालेय शिक्षणात आला तर जितेंद्र आव्हाड यांना काय आक्षेप आहे. मनाच्या श्लोकातून मुलांवर संस्कार होणार असतील तर त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप आहे का? चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ती मनुस्मृतीमध्ये स्वीकारली गेली त्याला विरोध असणे समजू शकतो त्याला आमचाही विरोध आहे. आमचे सरकार असेपर्यंत ते कुठल्याही अभ्यासक्रमात समाविष्ट करु दिले जाणार नाही असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
