तमाशा कलावंतांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध
विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केली संरक्षण देण्याची मागणी
सातारा
संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे तमाशा कलाकार व त्यातल्या त्यात महिला कलावंतांवर गाव गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा व तमाशातील मुलींची छेड काढली या प्रकरणाचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने निषेध करण्यात येत असून हल्ला करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशीही मागणी विद्रोहीने केली आहे.
या संदर्भात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर , संघटनेचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव , सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे , उपाध्यक्ष प्रा गौतम काटकर तसेच प्रवक्ते कॉ अविनाश कदम व कॉ
विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गावोगावी सध्या जत्रांचा हंगाम सुरू आहे आणि या जत्रांमधून तमाशाचे फड मालक आणि कलाकार आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दोन पैसे गाठीला जोडतात. अशावेळी त्यांना सन्मानाने जगता येत नाही. अपमानच जास्त होतो. हेच संगमनेर तालुक्यातील नुकत्याच झालेल्या घटनेमुळे दिसून येते
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळावर झालेला हा भ्याड हल्ला हा त्याचाच एक प्रकार आहे. लोककलावंतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलेला आहे. तमाशा फडातील मुली व पुरुषांवर झालेला हा भ्याड हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा तर आहेच. परंतु समाजकंटक कुठल्या थराला जातात त्याचाच हा नमुना आहे. असे डॉ भारत पाटणकर म्हणाले आहेत .
अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. परंतु केवळ गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार नाही तर याप्रकरणी शासनाने तमाशा फड मालकांना व कलाकारांना ठोस पद्धतीने संरक्षण द्यावे तसेच भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते कॉ विजय मांडके व कॉ
अविनाश कदम यांनी केली आहे.
लोककलावंत सुरक्षित असतील तरच कला टिकेल आणि कला टिकली तरच लोकसंस्कृती जिवंत राहील असेही विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे म्हणणे आहे.

