दीपलक्ष्मीच्या दिवाळी पहाट ‘स्वरां’नी उजळली शाहूपुरी


सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,विसाव्या वर्षात कार्यक्रमाला प्रचंड गर्दी

सातारा,
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला शाहूपुरी चौकात रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘स्वर’ ग्रुपच्या कलाकारांनी अनेक सुमधुर गाणी सादर करून दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने उजळून टाकली. प्रार्थना, भक्तीगीते, भावगीते, लावणी, प्रेमगीते अशा मराठी सुश्राव्य गीतांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सचिन शेवडे यांच्या ‘उठ मुकुंदा उठ श्रीधरा’ या भक्तीगीताने झाली. त्यानंतर प्राजक्ता भिडे यांनी ‘शंभू शंकरा करुणा करा’, सचिन शेवडे यांनी ‘आकाशी झेप घेरे पाखरा’, प्राजक्ता भिडे यांनी ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’, सचिन शेवडे यांनी ‘पहिलीच भेट ओढ लागली’, स्वरांगी शेवडे यांनी ‘पूर्वी सूर्य उगवला’ अशी गीते सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. पुढे प्राजक्ता भिडे यांनी ‘कल्पनेचा कुंचला स्वप्न रंगी रंगीला’, सचिन शेवडे यांनी ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, प्राजक्ता भिडे यांनी ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली’ तसेच ‘राजा ललकारी अशी साद दे’, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ ही गीते सादर करून कार्यक्रम उंचीवर नेला.यानंतर सचिन व प्राजक्ता यांनी ‘मंदिरात अंतरात तोच नांदत आहे’ हे गीत सादर केले. प्राजक्ता भिडे यांनी ‘दिवसा मागून दिवस चालले’, ‘दिसते मजला सुखचित्र नवे’, ‘कळीदार रंगला कान केवडा’ ही गीते सादर केली. तर सचिन शेवडे यांच्या ‘जीवा शिवाची बैल जोड’ या गीताला रसिक श्रोत्यांनी ‘वन्स मोअर’ दिला.

प्राचार्य यशवंत पाटणे यांनी ‘सा रे ग म प ध नी सा’ या स्वरांमध्ये मानवी जगण्याचे सुंदर तत्त्वज्ञान दडलेले असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. पहिला ‘सा’ सागराचा (पाताळ), ‘रे’ रेतीचा (पृथ्वी) आणि ‘ग’ गगनाचा (आकाश) प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तीन लोकांनंतर ‘म’ म्हणजे मनुष्य येतो. हा मनुष्य ‘प’ (पराक्रमी), ‘ध’ (धर्मशील) आणि ‘नी’ (नीतीसंपन्न) असा असावा. असा मनुष्य जेव्हा घडतो, तेव्हा शेवटचा ‘सा’ त्याला सुरांमुळे प्राप्त होणाऱ्या ‘सामर्थ्यसंपन्नतेचे’ रूप देतो, असे ते म्हणाले.
गायक सचिन शेवडे यांनी आपल्या गायनाच्या कार्यक्रमाचा ३०० चा टप्पा गाठून सातारकरांना अभिमान वाटेल असे दर्जेदार संगीतविश्व उभे केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच बालकलाकार ‘स्वरांगी’ हिच्या सुंदर सादरीकरणामुळे ‘स्वरा’ या ग्रुपचे कार्यक्रमाचे नामकरण पुढे ‘स्वरांगी’ असे व्हावे, अशी संकल्पना त्यांनी मांडली. प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केलेल्या सूचनेचा आदर करत, पुढील कार्यक्रमाला १००% ‘स्वरांगी’ हेच नाव दिले जाईल, अशी घोषणा सचिन शेवडे यांनी केली.
रेश्मा वाळिंबे यांचे ‘रेशीम धाग्यांसारखे’ जोडणारे सूत्रसंचालन, प्राजक्ता भिडे व अक्षता यांचे सादरीकरण, शांताराम दयाळ यांची ताल-सुरांची साथ आणि विजय कांबळे यांचे योगदान यांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढल्याचे पाटणे यांनी नमूद केले. शाहूपुरीवासीयांची दिवाळी पहाट सुरांनी सुगंधित केल्याबद्दल आयोजक शिरीष चिटणीस आणि शिल्पाताई चिटणीस यांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले. शिल्पाताई चिटणीस यांच्या ‘मोल नक्षत्रांचे साऱ्या नात्यांना लाभू दे’ या कवितेतील ओळींचा दाखला देत, दिवाळी हा प्रकाशमय सण सर्व नात्यांना मोलाचा आधार आणि समृद्धी देणारा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

Advertisement

मुकुंद फडके यांनी दिवाळी हा नात्यांना मोल देणारा सण असून पाडव्याला पती-पत्नीचे, भाऊबीजेला बहीण-भावाचे आणि एरवी मित्र-मैत्रिणींमधील स्नेहाचे नाते जपले व साजरे केले जाते, असे सांगितले. गायक सचिन शेवडे यांनी ‘स्वरा’ हा पूर्ण ताकदीचा व अतिशय सुंदर संगीतमय कार्यक्रम सादर केला. सचिन शेवडे यांच्या सादरीकरणावर सुधीर फडके यांच्या गाण्यांचे विशेष प्रेम व प्रभाव जाणवला, ज्यामुळे श्रोत्यांना एक सुरेल दिवाळी पहाट अनुभवायला मिळाली, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना शिरीष चिटणीस म्हणाले, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था गेली वीस वर्ष दिवाळी पहाट हा कार्यक्रम अविरतपणे घेत असून त्याला शाहूपुरीवासीय तसेच सातारकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही पतसंस्था केवळ आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून ती नेहमीच साहित्यिक, गायन अशा चळवळींना प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.

काका पाटील यांनी गायक सचिन शेवडे हे अत्यंत अष्टपैलू कलाकार असून त्यांचा ‘साताराचा सचिन तेंडुलकर’ अशा शब्दांत गौरव केला. आयोजक शिरीष चिटणीस यांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे विसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण घडवून आणले आहे. चिटणीस साहेब, सौ. शिल्पा चिटणीस व त्यांच्या संपूर्ण टीमच्या तळमळीचे आणि अथक परिश्रमांचे मनःपूर्वक कौतुक त्यांनी केले.
ममता नरहरी यांनी रेश्मा वाळिंबे यांचे सूत्रसंचालन हे पुणे-मुंबईतील मोठ्या कार्यक्रमांच्या तोडीचे व अत्यंत प्रभावी होते, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. आयोजकांच्या अशा चांगल्या उपक्रमांना भविष्यात जिथे जिथे गरज भासेल तिथे नेहमीच निश्चित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दयानंद घाडगे यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आयोजकांनी रसिक श्रोत्यांसाठी अतिशय सुरेख आणि चांगल्या संगीतमय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित करून मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या कार्यक्रमाचा शेवट सचिन व प्राजक्ता यांच्या ‘गुणगान करिये राम का’ या अप्रतिम गीताने झाला. अशा एकापेक्षा एक कर्णमधुर गीतांनी सातारकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘स्वर’ या कार्यक्रमात सचिन शेवडे, प्राजक्ता भिडे, स्वरांगी शेवडे यांनी आपली गाणी सादर केली असून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन ॲड. रेश्मा वाळिंबे यांनी केले. वादक शांताराम दयाळ, विजय कांबळे यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमावेळी शांताराम दयाळ यांनी तबल्यावर वाजवलेला तोडा रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद घाडगे, ममता नरहरी, मुकुंद फडके, हेमंत कासार, प्राचार्य यशवंत पाटणे, काका पाटील, डॉ शाम बडवे,संस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस, व्हा. चेअरमन आप्पासा शालगर, प्रदीप देशपांडे, अनिल चिटणीस, हणमंत खुडे, जगदीश खंडागळे, विनायक भोसले, रवींद्र कळसकर आणि इतर उपस्थित होते. दिवाळी पहाट कार्यक्रम ‘स्वर’ या गीत मैफिलीस शाहूपुरी नगरवासीय तसेच समस्त सातारकर रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!