प्रत्येक गाणे हा जीवनाचा धडा — शिरीष चिटणीस
स्वरसुरांनी भारावली दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहातील सुरेल मैफल*
सातारा,
सुरांच्या लहरींनी मनाचा प्रत्येक कोपरा उजळून निघावा, जुन्या-नव्या गीतांच्या स्वरांनी रसिकांच्या हृदयात भावनांचा दरवळ पसरावा आणि संगीताच्या माध्यमातून समाजमन अधिक समृद्ध व्हावे, अशा अविस्मरणीय वातावरणात दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि संगीतप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संगीतप्रेमी गाण्यांची सुरेल मैफल” गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे उत्साहात संपन्न झाली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृह स्वरांच्या जादूने मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन दीक्षित, ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके, चित्रपट अभ्यासक डॉ. सारिका देशपांडे, तसेच प्रमोद लोंढे, विनय कुलकर्णी आणि राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिरीष चिटणीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात संगीत ही मानसिक आरोग्याची मोठी गरज बनली आहे. संगीत माणसाला माणसाशी जोडते, समाजात संवाद निर्माण करते आणि नवचैतन्य देते. चित्रपट हेही अत्यंत प्रभावी माध्यम असून त्यातून समाजाला शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्यांची प्रेरणा मिळते. या मैफिलीत सादर होणाऱ्या प्रत्येक गीतामध्ये जीवनाचा अर्थ दडलेला आहे. संगीतासोबतच वाचन संस्कृती वाढावी, घरातील नव्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत आणि जीवनातील प्रत्येक संकटाला समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी निर्माण व्हावी, या व्यापक सामाजिक उद्देशाने आम्ही असे उपक्रम सातत्याने राबवत आहोत.”
यावेळी बोलताना गजानन दीक्षित म्हणाले, “मंचावर उभे राहून व्यक्त होण्याची संधी मिळाली की प्रत्येकामध्ये एक प्रभावी वक्ता घडत जातो. संगीत ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ते मानवी जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारे प्रभावी माध्यम आहे. यापूर्वी अशाच एका संगीत मैफिलीत मी सहभागी झालो होतो. अडीच-तीन तास कधी संपले, हेही कळले नाही. संगीताची ताकद एवढी विलक्षण आहे की दूध देणाऱ्या जनावरांना संगीत ऐकविल्यास त्यांच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याचे संशोधन सांगते. तसेच निराश, मानसिक तणावाखाली असलेल्या रुग्णांना काही दिवस सातत्याने संगीत ऐकविल्यास त्यांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण होते, सकारात्मक विचार वाढतात आणि अनेक रुग्णांना त्याचा लाभही झालेला आहे. संगीत हे मन, मेंदू आणि समाज यांना जोडणारे अद्भुत माध्यम आहे.”
डॉ. सारिका देशपांडे म्हणाल्या, “चित्रपट हे समाजपरिवर्तनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. अनेक महत्त्वाचे सामाजिक विषय चित्रपटांमुळे जनसामान्यांपर्यंत पोहोचले. एखादा विषय चित्रपटातून मांडला गेला की त्याचा प्रभाव अनेकपटीने वाढतो. चित्रपटांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्यातून होणारे प्रबोधनही महत्त्वाचे आहे. ‘तमाशामुळे समाज बिघडत नाही आणि किर्तनामुळेच समाज सुधारतो असेही नाही’, या विधानामागे कलाविष्काराकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित होते. चित्रपट किंवा संगीताविषयी मत व्यक्त करताना त्याचा अभ्यास करूनच बोलले पाहिजे.”
या सुरेल मैफिलीत गायक-गायिका रमिजा सय्यद, स्नेहल चिंचणे, सुजाता नावंधर, उज्वला करंबेळकर, सलाम अली बागवान, प्रदीप पवार, चारुहास सप्रे, डॉ. बारटक्के, सलीम चाचा आणि शरीफ सलाती यांनी हिंदी व मराठी चित्रपटसंगीतातील अजरामर गीतांचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांची मनं जिंकली. प्रत्येक गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. स्वर, ताल आणि भावनांचा सुंदर संगम अनुभवताना अनेक रसिक जुन्या आठवणींमध्ये रमून गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीतप्रेमीचे संस्थापक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील आणि विनयकुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.

