गाणे हे सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी मनाचा साथीदार-डॉ.लियाकत शेख


रफी-किशोर-मुकेश यांच्या सदाबहार गीतांची सुरेल मैफल
सातारा,
“गाणे म्हणजे केवळ शब्द आणि सूर नव्हेत, तर मनाला स्पर्शणारी एक सुंदर भावना आहे. आयुष्यातील सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी गाणे आपला साथीदार बनते. कधी ते आठवणींना उजाळा देते, तर कधी मनातील वेदनांना शब्द देते. एखादे गाणे ऐकताना आपण पुन्हा त्या काळात, त्या माणसांत आणि त्या भावनांत हरवून जातो. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एखादे गाणे असते, जे कायम मनात जिवंत राहते,” असे प्रतिपादन गायक आणि गायकीचे क्लास घेणारे डॉ. लियाकत शेख यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांच्या वतीने आयोजित ‘सूरसंगम’ भाग ९७ मध्ये रफी, किशोरकुमार आणि मुकेश यांच्या सदाबहार हिंदी गीतांची सुरेल मैफल दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये रंगली. या वेळी डॉ. लियाकत शेख, मुकुंद फडके, डॉ. सारिका देशपांडे, हेमंत कासार,दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शिरीष चिटणीस,शहाबुद्दीन शेख,युनूस शेख आणि राजेश वंजारी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मुकुंद फडके म्हणाले,संगीत क्षेत्रात गायक एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन एकमेकांच्या गायकीचे कौतुक करतात, ही अत्यंत मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे .मोहम्मद रफी, मुकेश आणि किशोर कुमार यांच्यातील निखळ मैत्रीची उदाहरणे देत, त्यांनी कधीही आपापसात स्पर्धा न करता नेहमी एकमेकांच्या गायकीचा आदर व कौतुक केले हे रेखांकित केले.रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या व लता मंगेशकर यांची नक्कल करणाऱ्या गायिकेचे उदाहरण देत, केवळ नक्कल जास्त काळ टिकत नाही; संगीतात टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि स्वतःचा अस्सल आवाज आवश्यक असतो असे प्रतिपादन केले.सातारामध्ये संगीताची चळवळ टिकवून ठेवण्यासाठी शेख बंधू आणि डॉ. शेख करत असलेले प्रयत्न स्तुत्य व अभिनंदनीय आहेत.१० ऑक्टोबरला अभिनेत्री रेखा आणि ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्याने, या दोन्ही कलाकारांच्या गाण्यांचे कॉम्बिनेशन करून ‘सुर संगम’चा १०० वा कार्यक्रम आयोजित करावा, अशी विशेष सूचना मुकुंद फडके यांनी मांडली.

Advertisement

शिरीष चिटणीस यांनी संगीताच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याच्या ‘सूरसंगम’च्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.चित्रपटसृष्टी तसेच स्वातंत्र्यलढ्यात विविध समाजघटकांनी दिलेल्या योगदानाची माहिती आपण वाचली पाहिजे, त्यामुळे समाजाविषयीचे ज्ञान अधिक व्यापक होते, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना चिटणीस म्हणाले की, फळे विकणारे, खेळणी विकणारे, मोबाईल दुकानात काम करणारे अशा सर्वसामान्य नागरिकांनाही या मंचावर येऊन गाणी सादर करण्याची संधी मिळते. सातार्‍यात अशा संगीतमय विचारांची गरज असून ग्रामीण भागातील वारकरी परंपरेमुळे लोकांमध्ये उपजतच संगीत व रागदारीचे ज्ञान निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सारिका देशपांडे यांनी संगीताच्या ‘डोमिनंट’ व ‘रिसेसिव्ह’ बीटचे स्वरूप सोप्या भाषेत स्पष्ट करून ‘ऑफ-बीट’ संगीताची संकल्पना श्रोत्यांसमोर मांडली. तांत्रिक संज्ञा माहीत नसल्या तरी सामान्य रसिकही ऑफ-बीट गाण्यांचा वेगळ्या पद्धतीने आनंद घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. ‘सूरसंगम’च्या मंचावर कमी ऐकली जाणारी व दुर्मीळ, दर्जेदार गाणी सादर होतात. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट ऐकायला मिळते. कलाकारांचे चेहऱ्यावरील हावभाव, अभिनय आणि अभिवाचनाच्या शैलीतील सादरीकरणही विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मैफलीत स्वाती शेडगे, शहाबुद्दीन शेख, युनुस शेख, नासिर पालकर (व्हॉइस ऑफ मोहम्मद रफी), राजेश वंजारी, तुषार पाटील, अमोल जाधव आणि फारुख शेख यांनी रफी, किशोरकुमार व मुकेश यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. गीत-संगीत मार्गदर्शन युनुस शेख यांनी केले, तर निवेदन राजेश वंजारी यांनी केले. ऑडिओ-व्हिडिओ संयोजन कलाकार स्टुडिओ, सातारा यांचे होते. सदाबहार गीतांच्या सुरावटींना उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी मैफलीचा मनमुराद आनंद लुटला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!