‘वावरात ‘ कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न


श्रमसंस्कृतीचा जिवंत दस्तऐवज ठरणारा काव्यसंग्रह – डॉ श्रीपाल सबनीस

सातारा
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या वतीने सोमण सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वावरात ‘या कविता संग्रहा चे प्रकाशन संपन्न झाले.ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्रीधर साळुंखे आणि अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक डॉ. रविंद्र भारती उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतील आशय अधिक विस्ताराने मांडला. ‘वावरात’ हा केवळ कवितांचा संग्रह नसून शेतकरी, काळी माती आणि श्रमसंस्कृतीचा जिवंत दस्तऐवज आहे, असे सांगत त्यांनी या कवितांमधील कृषी जीवनाचे वास्तव, ग्रामीण अर्थकारण आणि मानवी संवेदनांचे प्रभावी दर्शन घडते, असे नमूद केले. हा संग्रह श्रमिकांच्या समर्पणाची आणि भक्ती-शक्तीची नांदी ठरतो, असेही त्यांनी सांगितले.
यातल्या यमक-अनुप्रासांनी सजलेल्या ओळी ग्रामीण जीवनातील भावविश्व अधिक प्रभावी करतात. कुणब्याची निष्ठा जितकी काळ्या विठ्ठलावर, तितकीच काळ्या मातीवर असल्याचे कवीने समर्थपणे मांडले आहे. ‘मातीत पाहतो विटेवरला सावळा, मातीचा अबीर भाळा’ या ओळींतून भक्ती आणि भूमीचे नाते अधोरेखित होत असल्याचे डॉ. सबनीस यांनी स्पष्ट केले.अनेक काव्यपंक्तींमधून निसर्गसौंदर्य आणि कल्पनाविलासाची सुंदर अभिव्यक्ती झाल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी त्यांच्या मनोगतात गावाकडच्या मातीचा गंध आणि शेतकऱ्याच्या आयुष्याचा ठसा साहित्यामध्ये जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य प्रा. नंदकुमार शेडगे यांनी केले असल्याचे सांगितले. कवी ना.धो महानोर , इंद्रजीत भालेराव यासारख्या कविंनी निसर्ग कवितांना नविन परिमाण दिले . ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेले साहित्यच समाजाला वास्तवाची जाणीव करून देते, असे ही मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ रविंद्र भारती यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि ग्रामीण साहित्याची परंपरा यांचा वेध घेत कार्यक्रमाच्या उद्देशाचे विवेचन केले. व अश्वमेध ग्रंथालयाच्या साहित्य कार्याची माहिती दिली.
त्यानंतर प्रा. श्रीधर साळुंखे यांनी ‘वावरात’मधील ग्रामीण जीवनदृष्टी, मातीशी असलेले नाते आणि आधुनिक काळातही कृषी संस्कृतीचे जतन करण्याची आवश्यकता यावर भाष्य केले.
या कार्यक्रमासाठी अनेक साहित्यिक कवी लेखक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सौ. मनिषा शिरटावले यांनी केले.तसेच सौ विद्या शेडगे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले .
यावेळी डॉक्टर शरद गायकवाड ,प्रदीप कांबळे ,विश्वजीत जाधव,युवराज खरात,सुभाष गुरव,कांता भोसले,अरुण माने,दीपक ननावरे, वि ना लांडगे ,सुरेखा कुलकर्णी,गौतम भोसले,स्वप्निल शिंदे व नंदकुमार शेडगे यांचे आई वडील आणि साहित्य प्रेमी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!