यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘नारीशक्ती’चा जागर


पाच हजार विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाचे धडे
सातारा :
महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित या संकल्पनेतून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या विशेष स्वयंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाला यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजित या उपक्रमात अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, पदविका आणि इतर विविध अभ्यासक्रमांतील जवळपास पाच हजार विद्यार्थी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वयंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
भारताच्या पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर म्हणून परिचित असलेल्या शैला टीके कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, हल्ल्याच्या परिस्थितीत प्रसंगावधान कसे राखावे, शारीरिक हालचालींचा योग्य वापर कसा करावा तसेच मानसिकदृष्ट्या खंबीर राहून परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनाही विविध स्वयंरक्षण तंत्रे प्रत्यक्ष करून पाहण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रम केवळ मार्गदर्शनापुरता मर्यादित न राहता तो अत्यंत संवादात्मक आणि प्रात्यक्षिकाधारित ठरला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध तंत्रांचा सराव केला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.
स्वयंरक्षण म्हणजे केवळ शारीरिक ताकद नसून मानसिक सामर्थ्य, प्रसंगावधान, आत्मविश्वास, बौद्धिक सजगता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांचा समन्वय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थिनींनी संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता परिस्थितीचे भान ठेवावे, मदत मिळविण्यासाठी योग्य मार्गांचा वापर करावा आणि आवश्यकतेनुसार स्वतःचा बचाव करण्यासाठी सज्ज राहावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, विपुल पाटील, शैला टीके कुलकर्णी संजय शेलार, कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे आणि डॉ. विक्रम पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने आणि सजगतेने परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित राहते आणि कुटुंब सुरक्षित असेल तर समाज अधिक सक्षम व सुरक्षित होतो, या विचाराला कृतीची जोड देणारा हा उपक्रम यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील विद्यार्थिनींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Advertisement

स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि प्रसंगावधान निर्माण करते
“विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणे हा यशोदा टेक्निकल कॅम्पसचा उद्देश नसून त्यांना जीवनातील प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सक्षम करणे हीदेखील आमची जबाबदारी आहे. स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि प्रसंगावधान निर्माण करते. ‘नारीशक्ती’सारखे उपक्रम विद्यार्थिनींना सक्षम करण्याबरोबरच सुरक्षित आणि संवेदनशील समाज घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सक्षम आणि सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत राहील.”
प्रा. डॉ. दशरथ सगरे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!