दैव जाणिले कुणी कादंबरीचे मंगळवारी प्रकाशन


दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये प्रकाशन सोहळा

Advertisement

सातारा
सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि कवी माधव मनोहर जोशी यांनी लिहिलेल्या “दैव जाणिले कुणी” ह्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक १८ मार्च ०२५ रोजी साताऱ्यातील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ येथे सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. हा सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांच्या पुढाकाराने होणार आहे. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मधुसूदन नेने भूषवणार असून प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील पटवर्धन हे या कादंबरीचे प्रकाशन करणार आहेत.यावेळी प्रख्यात लेखक डॉक्टर राजेंद्र माने आणि मुकुंद फडके, तसेच कादंबरीचे प्रकाशक अजित अंतुरकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस हे आपले विचार श्रोत्यांसमोर मांडणार आहेत. ही कादंबरी पुण्याच्या हेरंबप्रीत प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.
पेशाने मूळचे मेकॅनिकल इंजिनियर असलेले माधव मनोहर जोशी हे निवृत्तीनंतर साहित्य क्षेत्राकडे वळले आणि गेल्या सहा वर्षात त्यांच्या एकंदर पाच मराठी कादंबऱ्या, एक इंग्रजी कादंबरी आणि तेरा कथांचा समावेश असलेला एक कथासंग्रह आत्तापर्यंत प्रकाशित झालेला आहे. माधव मनोहर जोशी हे एक चांगले कवी सुद्धा असून साडेतीन चरणी ओव्या रचण्यात त्यांचा हातखंडा आहे. “माधव हा म्हणे” ह्या नावाचा त्यांचा अभंग संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी लहान मुलांसाठी मनोरंजक तसेच बोधप्रद अशा छोट्या छोट्या गोष्टींचा इंग्रजी भाषेतून लिहिलेला कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या पुढील तीन कादंबऱ्या सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
नोकरीत असताना माधव मनोहर जोशी यांना कामानिमित्त संपूर्ण जग पालथे घालावे लागले होते आणि आत्तापर्यंत त्यांनी पाच खंडातील एकंदर २१ देशांना वारंवार भेटी दिलेल्या आहेत. ह्या सर्व विदेश भेटी दरम्यान त्यांनी फार मोठा अनुभव मिळवत मित्रांचा संचय केलेला आहे आणि ह्या नानाविध अनुभवांचा ठसा त्यांच्या लिखाणामध्ये दिसून येतो. आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ज्या सहा कादंबऱ्या आहेत त्या प्रत्येकीचा विषय हा आगळा वेगळा असाच आहे. श्री जोशी यांनी त्यांच्या दक्षिण पूर्व आशियाई देशात केलेल्या विविध दौऱ्यांमध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित अशी “सफर देशोदेशीची” ह्या नावाची लेखमाला अमेरिकेतील शिकागो येथील रचना या नावाच्या त्रेमासिकात गतसाली प्रकाशित झाली होती, ह्या मालिके अंतर्गत त्यांनी एकंदर चार प्रदीर्घ लेख लिहिले होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!