विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक
अर्थसंकल्पावरील चर्चेत डॉक्टर विजय कुंभार यांचे प्रतिपादन
सातारा
विद्यमान केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबवण्यात येत आहेत. पण जोपर्यंत विकासाची ही गंगा तळागाळातील सामान्य लोकंपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अर्थसंकल्पातीळ योजनांना पूर्णत्व येणार नाही असे प्रतिपादन जेष्ठ अर्थतज्ञ आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय कुंभार यांनी केले
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह,दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा यांच्यातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर विजय कुंभार बोलत होते.
स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच सरकारांनी देशाचा विकास करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी अजूनही विकासाची ही फळे संपूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाहीत.जागतिक अर्थव्यवस्थांची तुलना करता भारतातील दारिद्र्य अद्यापही कमी झाले नाही आणि एकूणच मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमताही कमी आहे असेही ते म्हणाले.शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणार नाही आणि देशातील शेतकऱ्याला जोपर्यंत आपल्या उत्पादनांची किंमत ठरवण्याचा अधिकार मिळणार नाही तोपर्यन्त शेतकरी सुखी होणार नाही अशी महणू त्यांनी केली
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्याने सरकारकडून सर्व समावेशक अशा अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात येत आहे ही स्वागताची बाब आहे. मात्र अर्थसंकल्पात जे नियोजित करण्यात येते त्याची तेवढ्याच प्रभावाने अंमलबजावणी झाली तरच जे काही ठरवले आहे ते पूर्ण होऊ शकेल असेही डॉक्टर विजय कुंभार म्हणाले.आपला भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था झाली असली तरी आनंदीपणा निर्देशांक ,मानवी विकास निर्देशांक याचा विचार करता आपण खूप मागे आहोत आणि या क्षेत्रात काम करण्यासारखे खूप काही आहे असे ते म्हणाले
यावेळी चर्चेत भाग घेताना ज्येष्ठ पत्रकार व कर सल्लागार मुकुंद फडके यांनी अर्थसंकल्पातील करविषयक सवलतींची माहिती दिली . सामान्य करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प निराशादायक आहे असे वाटत असले तरी गेल्यावर्षीचा अर्थसंकल्पांमध्येच प्रत्यक्ष कर रचनेत काही मूलभूत बदल करण्यात आल्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात असे कोणतेही बदल अपेक्षित नव्हते असे त्यांनी सांगितले. आयकर कायदा १ एप्रिल 2026 पासून लागू होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कर रचनेला निश्चित अशी दिशा मिळेल असेही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अर्थतज्ञ व निवृत्त बँक अधिकारी श्रीराम नानल यांनी या अर्थसंकल्पातील इतर विषयांचा आढावा घेतला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल म्हणून या अर्थसंकल्पाकडे पहावे लागेल असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला विकास, युवा विकास, क्रीडा विकास अशा अनेक क्षेत्रांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे ही स्वागताची बाब असली तरी बँकिंग सारख्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्री यांनी केले
यावेळी व्यासपीठावर आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले उपस्थित होते
डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या हस्ते डॉक्टर विजय कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. संस्कार भारती सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी सुद्धा डॉक्टर विजय कुंभार यांचा सत्कार केला
फोटो
डॉक्टर विजय कुंभार यांचा सत्कार करताना डॉक्टर संदीप श्रोत्री, समवेत मुकुंद फडके व श्रीराम नानल

