वृक्षप्रेमींच्या सक्रियतेने ४६ झाडांना अभय!


पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्त्यावर प्रशासनासमवेत फेरसर्वेक्षण

Advertisement

साताराः
रस्ता विकसन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी होऊ घातलेली वृक्षतोड जागरूक वृक्षप्रेमींच्या सक्रियतेमुळे टळली आहे. प्रशासन आणि वृक्षप्रेमींनी केलेल्या संयुक्त फेरसर्वेक्षणाचे फलित म्हणून पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्त्यावरील ४७ पैकी ४६ झाडे वाचविण्यात यश आले आहे.
रस्ता विकसन आणि सुशोभीकरणासाठी सातारच्या पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्त्यावरील झाडे तोडली जाणार असल्याची माहिती वृक्षप्रेमींना मिळाली. पाहणी केली असता ४७ वृक्ष तोडण्यासाठी चिन्हांकित केल्याचे निदर्शनास आले. वृक्षप्रेमींच्या समूहाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवीकुमार अंबेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यानुसार मंगळवारी (दि. २) या रस्त्यावर फेरसर्वेक्षण करण्यात आले. श्री. अंबेकर यांच्यासह शाखा अभियंता रूपेश नारबत, रस्ता विकसक प्रतिनिधी उमाकांत जाधव, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, वनस्पतीतज्ज्ञ प्रा. डॉ. सुजित जाधव, हेमा सोनी, राजीव मुळ्ये, अॅड. शैलजा जाधव, राजेश मोरे, केतन मोहिते, शैलेंद्र पाटील, सागर गायकवाड आदींनी सुमारे दोन तास या रस्त्यावरील वृक्षांचे फेरसर्वेक्षण केले.
या रस्त्यावरील ४७ पैकी एकच वृक्ष विकासकामांसाठी पूर्णपणे तोडावा लागणार असून, दोन वटवृक्ष रस्त्याच्या बाजूने खडसून तसेच ठेवता येतील, यावर फेरसर्वेक्षणादरम्यान सर्वांचे एकमत झाले. त्यामुळे ४६ वृक्षांना नवजीवन मिळाले असून, विकासकामेही सुरळीत होणार आहेत. प्रशासनाने घेतलेल्या निसर्गपूरक भूमिकेबद्दल वृक्षप्रेमींनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.
वृक्षतोडप्रश्नी लवकरच बैठक
सातारा शहर, तालुका आणि परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांसाठी वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहरातील वृक्षप्रेमींनी दि. १९ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. वाढते तापमान, प्रदूषण आदी घटकांचा विचार करून रस्त्यांचा विकासही होईल आणि वृक्षही वाचतील, अशी कार्यप्रणाली वापरण्याची विनंती केली. संबंधित रस्त्यांवरील झाडांचे फेरसर्वेक्षण करावे आणि या प्रक्रियेत वृक्षप्रेमींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. त्यानुसार बोगदा ते ठोसेघर रस्त्यावर वृक्षप्रेमींनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सर्वेक्षण पूर्णही केले आहे. यासंदर्भात सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची वृक्षप्रेमी समूहाबरोबर बैठक आयोजित करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असून, लवकरच ही बैठक प्रस्तावित आहे.
……….
फोटो ओळ
सातारच्या पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्त्यावरील झाडांचे अधिकारी आणि वृक्षप्रेमींनी मंगळवारी फेरसर्वेक्षण केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!