यशोदा शिक्षण संस्थेचे बहुजनांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान


डॉ. अजिंक्य सगरे यांनी वारसा सक्षमपणे पुढे न्यावा: चंद्रकांत दळवी
सातारा :
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने डॉ. अजिंक्य सगरे यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षण, संशोधन आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या यशोदा शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी यांनी यशोदा शिक्षण संस्थेने बहुजनांच्या शिक्षणासाठी दिलेल्या भरीव योगदानाचा उल्लेख केला. यशोदा इन्स्टिट्यूट्समधील संशोधन कार्य हे केवळ शैक्षणिक मर्यादेत न राहता समाजासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण अधिक पोषक आणि गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करत, हा वारसा पुढील पिढीने पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चंद्रकांत दळवी यांनी संशोधन हे उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यशोदा टेक्निकल कॅम्पसची रचना व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट असून, ‘ग्रीन कॅम्पस’ संकल्पनेतून यशोदाने उचललेले पाऊल समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीदिनी डॉ. अजिंक्य सगरे यांचा सत्कार होत आहे, ही बाब विशेष आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने प्रवेशाच्या पहिल्याच वर्षी त्यांच्या कौशल्यांची ओळख करून घेणे आणि त्यानुसार मार्गदर्शन करणे संस्थांसाठी फायदेशीर ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. विजय पाटील यांनी डॉ. अजिंक्य सगरे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशोदा संस्थेचा कार्यविस्तार अधिक व्यापक स्तरावर नेण्यासाठी सदिच्छा व्यक्त करताना, डॉ. अजिंक्य सगरे यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान हे त्यांच्या कार्याचे खरे फलित असल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढले.आरएमके ग्रुपचे सर्वेसर्वा श्री. रामदास काकडे यांनीही डॉ. अजिंक्य सगरे यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक करत, शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. अजिंक्य सगरे यांचा सत्कार श्री. चंद्रकांत दळवी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. अजिंक्य सगरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे आणि कुटुंबीयांचे आभार मानले. भविष्यातील दीर्घकालीन शैक्षणिक व संशोधन योजनांसाठी सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, अशी भावनिक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. अजिंक्य सगरे यांनी आगामी काळात शिक्षण, संशोधन व समाजोपयोगी उपक्रमांच्या दृष्टीने अनेक मोठे आणि दीर्घकालीन प्रकल्प मनात असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणे, विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणे तसेच यशोदा संस्थेचा शैक्षणिक व सामाजिक ठसा अधिक व्यापक पातळीवर उमटवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण विचारांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले असून, सर्वांनी एकमुखाने त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व पाठिंबा व्यक्त केला.

Advertisement

कार्यक्रमाला यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सचिव सौ. साधना सगरे, तळेगाव दाभाडे येथील श्री. बाळासाहेब काकडे, श्री. चंद्रकांत शेटे, श्री. संजय साने, प्राचार्य डॉ. संभाजी मलगे, पुणे येथून डॉ. विजय सावंत, श्री. अजिंक्य जगताप, गोव्यावरून श्री. विशाल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सल्लागार समितीचे सदस्य संजय मोरे, संजय शेलार, अतुल माळी, संजय कदम, रणजीत घाडगे, राजेंद्र साळुंखे, सतीश जाधव यांच्यासह यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच यशोदा शिक्षण संस्थेच्या सर्व विद्या शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश सुरवसे यांनी केले, स्वागत डॉ. रणधिरसिंह मोहिते यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया भांडवलकर, श्रोनवि पवार यांनी प्रभावीपणे पार पाडले.

फोटो:

डॉ. अजिंक्य सगरे यांच्या सत्कार प्रसंगी चंद्रकांत दळवी, प्रा. दशरथ सगरे, साधना सगरे, रामदास काकडे, बाळासाहेब काकडे, विजय पाटील, डॉ. विजय सावंत, आणि मान्यवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!