डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या पुस्तकांचे सोमवारी प्रकाशन
आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
वाचकांना भावसमृद्ध करणाऱ्या विदुषी,लेखिका प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या ‘नोबेल साहित्य दर्शन’(१९९३ ते २०२२)भाग १ आणि ‘थोडे जनातले थोडे मनातले’ या दिलीपराज प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ ‘आम्ही पुस्तकप्रेमी समूह’ सातारा व दीपलक्ष्मी पत संस्था,सातारा यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समीक्षक-लेखक प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के यांचे हस्ते आणि म.सा.प., पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल-सातारा येथे सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आश्लेषा महाजन, लेखिका-पर्यावरण तज्ञ ॲड.सीमंतिनी नूलकर,दिलीपराज प्रकाशनचे मधुर बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. अश्विनी धोंगडे या एसएनडीटी महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. इंग्रजी हा त्यांचा शिकवण्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्या मुख्यतः स्त्रीवादी साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे स्त्रीसूक्त हे पुस्तक पहिले स्त्रीवादी कवितांचे पुस्तक म्हणून गाजले आहे आणि त्याला महाराष्ट्राच्या केशवसुत पुरस्काराबरोबर इतर अनेक पुरस्कार लाभले आहेत.अश्विनी धोंगडे यांची जवळजवळ ५० पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये चार कादंबऱ्या, एक कथासंग्रह,पाच कविता संग्रह, दोन प्रवास वर्णने, दोन चरित्र, ललित लेखांचे पुस्तक, सामाजिक साहित्य, बालसाहित्य इत्यादींचा समावेश आहे. स्त्रीवादी साहित्य स्वरूप आणि उपयोजन, संदर्भ स्त्री पुरुष ही पुस्तके विद्यापीठांमधे अभ्यासासाठी लागली आहेत.स्त्री एक बहुरूप दर्शन आणि भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य या पुस्तकांना विशेष पुरस्कार लाभले आहेत. लेखनासाठी एकूण २५ पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्यांनी २०० हून अधिक कवी संमेलनात सहभागी घेतला आहे. ४०० व्याख्याने दिली आहेत. ६ प्रादेशिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यानी भूषवले आहे.
या प्रकाशन समारंभाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही पुस्तकप्रेमी समूह प्रमुख डॉ.संदीप श्रोत्री,समन्वयक श्रीराम नानल,म.सा.प., पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी केले आहे

