दिल्लीतही ‘लाडकी बहीण योजना
अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
नवी दिल्ली
पुढील वर्षात होणाऱ्या दिल्ली विधानभा निवडणुकांच्या अगोदरच राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येथील लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.यावेळी मुख्यमंत्री अतिशी या उपस्थित होत्या
दिल्लीत पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली. त्यामध्ये, महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची सर्वात मोठी घोषणा केजरीवाल सरकारने केली आहे. तर, ऑटो रिक्षा चालकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. दिल्ली सरकारच्या कॅबिनेटने आज महिला सन्मान योजनेला मंजुरी दिली असून या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे आजपासून महिलांना ते 1 हजार रुपये दिले जाणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास ही रक्कम वाढून 2100 रुपये करण्यात येईल, अशी आश्वासन देणारी घोषणा देखील केजरीवाल सरकारने केली आहे.
70 सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे विधानसभेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येथे 2015 आणि 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मोठं यश मिळवत 10 वर्षे सत्ता स्थापन केली. त्यामुळे, यंदा सत्तास्थापनेची हॅट्ट्रीक करण्यासाठी आप सज्ज असून आजच विविध घोषणांच्या माध्यमांतून दिल्लीतील जनतेला आकर्षित करण्यात आलं आहे

