डॉ. किसन महाराज साखरे कालवश
वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार
पुणे
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी पुण्यातील चिंचवड येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
प्रकृती बिघडल्याने डॉ. किसन महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
डॉ. किसन महाराज साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ आणि पुत्र यशोधन साखरे आणि चिदम्बरेश्वर साखरे आहेत. आळंदी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साखरे महाराज यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. तसेचे आळंदी, देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. याशिवाय ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे.
साखरे महाराजांनी संस्कृत आणि मराठीतून एकूण ११५ ग्रंथ लिहिले आहेत. त्यात सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र आदी ग्रंथसंपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली. एकूण ५०० ताम्र पटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे.

