तर्कतीर्थांनी प्रगत पांडित्य ही कल्पना रुजवली
व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन
सातारा
वेद आणि धर्म यांचा अभ्यास करणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी देशात प्रगत पांडित्य ही कल्पना रुजवली.काळाप्रमाणे विचारधारा बदलणे गरजेचे असते हे त्यांनी दाखवून असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ( थोरले ) नगर वाचनालय तसेच दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या त्रिदिवसीय व्याख्यानमाला येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये संपन्न झाली. या व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र साहित्य या विषयावर ते बोलत होते.डॉ लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याच्या १८ खंडाचे संपादन केले असून त्याचे नुकतेच प्रकाशन झाले आहें
या विषयी माहिती देताना डॉ. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे आयुष्य अनुभवसमृद्ध होते. काशी ,बडोदा किंवा वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत अनौपचारिक शिक्षण घेऊन त्यांनी ज्ञान मिळवले ज्ञानाचा प्रसार,संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञानोपासना करण्याचा वसा त्यांनी घेतला होता विशिष्ट कल्पनांना चिकटून बसण्याऐवजी काळाप्रमाणे नवीन कल्पना स्वीकाराव्यात अशी प्रगत पांडित्य ही कल्पना त्यांनी रुजवली
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विपुल लेखन केले भाषणे केली प्रस्तावना लिहिल्या परिसंवादात भाग घेतला या निमित्ताने त्यांची विचारधारा समोर येते समग्र साहित्याच्या १८ खंडामध्ये या सर्व गोष्टींचे संकलन झाले असून त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व समोर येते असेही डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले
जुन्या काळातील वेद ते आधुनिक काळातील वेब यांचा अनोखा संगम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात झाला होता असेही डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी स्पष्ट केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर येथील डॉ विश्वास सुतार यांनी केले त्यांनी डॉ सुनीलकुमार लवटे यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला
सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले.
आभार डॉ संदीप श्रोत्री यांनी मानले.

