संगीत मानसिक प्रसन्नतेचे प्रभावी माध्यम: शिरीष चिटणीस


दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर्स क्लबची संयुक्त मैफिल संपन्न

Advertisement

सातारा
“संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून माणसाच्या धकाधकीच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि मानसिक प्रसन्नता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. संगीतामुळे माणसे एकत्र येतात, परस्परांमधील स्नेहभाव वाढतो आणि सामाजिक संवादालाही चालना मिळते,” असे प्रतिपादन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा व सुहाना सफर सिंगर्स क्लब, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मस्ती भरा है समा” या हिंदी गीतांच्या सुश्राव्य मैफलीत ते बोलत होते. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमासाठी हेमंत कासार, विजय साबळे,राजेंद्र पाटील,प्रदीप देशपांडे,डॉ सारिका देशपांडे आणि इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मराठी भाषेने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्राला दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे शिरीष चिटणीस यांनी नमूद केले. कराओकेच्या माध्यमातून अनेक ‘बाथरूम सिंगर्स’ घराबाहेर आले असून त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे, असे ते म्हणाले. प्रत्येकाकडे शास्त्रीय संगीताची मोठी बैठक असेलच असे नाही; मात्र संगीताची आवड आणि सादरीकरणाची इच्छा असलेल्या सर्वसामान्य व्यक्तीलाही या माध्यमामुळे संधी मिळते. त्यामुळे लोक एकत्र येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
फ्लॅट संस्कृतीमुळे कमी होत चाललेला सामाजिक संवाद आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे पुन्हा वाढीस लागत आहे, असे चिटणीस यांनी अधोरेखित केले.
यावेळी चिटणीस यांनी येत्या ८ नोव्हेंबर २०२६ रोजी शाहूपुरी चौकामध्ये दीपलक्ष्मी नागरी पतसंस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या “दिवाळी पहाट” या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
या मैफलीत विजय साबळे, शिरीष खुटाळे, डॉ. सुनील पटवर्धन, डॉ. हेमंत मांडवे, डॉ. सुहास पाटील, चंद्रशेखर बोकील, सचिन शेरकर, मिलिंद हर्षे, शिवकुमार, सलाम अली, मंजुषा पोतनीस, सुषमा बगाडे, स्मिता शेरकर, कविता शिवकुमार, रेवती बंड, ममता नरहरी, दिपाली घाटगे, श्रुती बेंद्रे, स्मिता कोरपे, कलाचंद आणि मीनाक्षी मांडवे या गायक कलाकारांनी आपली गायनकला सादर केली. “माना हो तुम बेहद हसी”, “पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे”, “फुलोका तारोका सबका कहना है” “एक हजारो मे मेरी बहना है”, “रोज शाम आती थी मगर ऐसी ना थी”, “प्यार दीवाना होता है मस्ताना होता है” “हर खुशी से हर गम से बेगाना होता है” यासारख्या अनेक लोकप्रिय गीतांनी वातावरण गायकांनी सुरेल केले. कलाकारांनी गीतांची केलेली निवड, सादरीकरणातील सहजता आणि रसिकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.
कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांनी केले, तर सुसंवाद दिपाली गीते यांनी साधला. ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांनी पाहिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!