पुण्यात शिकायला येणारी अनेक मुले कुपोषित


अनेकांना ऍनिमिया असल्याचे सर्वेक्षणात उघड
पुणे
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, गरीब घरांमधून पुण्यात आलेल्या अनेक मुली आणि अनेक मुलांना ऍनिमिया म्हजेच रक्तक्षय असल्याचं नुकत्याच एका सर्वेणक्षणातून समोर आलं आहे.पुण्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली जवळपास 72,000 मुलं शिकतात.
स्टुडंट्स हेल्पिंग हॅन्ड्स आणि राष्ट्र सेवा दल या दोन संस्थांनी केलेल्या या आरोग्य सर्वेक्षणात 579 तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता. त्यातल्या 41 टक्के मुलींना आणि 23 टक्के मुलांना रक्तक्षय असल्याचं सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. यात एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश आहे.
चांगलं, सकस आणि पुरेसं पोटभर जेवण न मिळणं हेच त्यांच्या रक्तक्षयामागचं कारण आहे असे या सर्वेक्षणात म्हटले आहे
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रक्तातल्या लाल पेशी किंवा त्यामधल्या हिमोग्लोबीनची संख्या सामान्य पातळीपेक्षा कमी असल्यानं उद्भवणारी स्थिती म्हणजे रक्तक्षय. यालाच ॲनिमिया असंही म्हणतात.रक्तक्षय असेल तर गरगरणं, चक्कर येणं, थकवा जाणवणं अशा काही साध्या, तर काही गुंतागुंतीच्या समस्याही जाणवू शकतात,
या सर्वेक्षणात 18 ते 24 या वयोगटातले, बाहेरून पुण्यात शिकायला आलेल्या 215 तरुणी आणि 364 तरुण सहभागी झाले होते.सर्वेक्षण दोन भागात करण्यात आलं. पहिल्या भागात या मुलांची रक्त तपासणी केली गेली. 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या काळात प्रत्येक रविवारी (एकूण 9) थोड्या थोड्या मुलांचे रक्ताचे नमुने जमा करून त्याची तपासणी केली गेली. दुसऱ्या भागात या तरुण-तरुणींकडून त्यांच्या आहारासंबंधी आणि आरोग्याविषयीची वस्तूस्थिती नोंदवणारी आणि त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेणारी एक प्रश्नावली भरून घेतली.डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या अहवालात प्रामुख्यानं 89 मुलींना (41 टक्के) आणि 85 (23 टक्के) मुलांना रक्तक्षय असल्याचं निदान झालं. त्यात सौम्य रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबीन 11 ते 12 g/dl असणाऱ्या मुलींची संख्या 42 होती, तर, 47 मुलांना सौम्य रक्तक्षय असल्यानं त्यांचं हिमोग्लोबीन 12 ते 14 g/dl होतं.

Advertisement

रक्तक्षय सौम्य असला तरी दीर्घकाळ अशी स्थिती राहिली, तर त्याचा हृदयावर ताण पडतो. हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला जास्त जोरानं रक्ताभिसरण करावं लागतं. शरीराच्या इतर अवयवांना आणि खासकरून मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सतत कमी पडत असेल, तर त्याचे परिणाम दीर्घकाळानं शरीरावर दिसू लागतात,

ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या बहुतेक तरुण-तरुणी अशाच अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून येतात. त्यातील बहुतेकांनी प्रश्नावलीत पालकांचा व्यवसाय शेती असा नोंदवला आहे. मात्र, या मुलांशी चर्चा केली तेव्हा अनेकांचे पालक अल्पभुधारक असून ते पूर्णवेळ किंवा अर्धवेळ शेतमजुरी करतात असं समोर आलं.चांगलं, सकस आणि पुरेसं पोटभर जेवण न मिळणं हेच त्यांच्या रक्तक्षयामागचं कारण आहे, असंही हे सर्वेक्षण सांगतं.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!