साताऱ्यात नाट्यसंमेलन घेण्याची मागणी करणार
साहित्य संमेलन समिती सदस्य प्रमाणपत्र वाटप समारंभात शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा
सातारा
‘‘९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्याने यशस्वी करून दाखवले, लवकरच आपण नाट्य संमेलनाची मागणी करणार असून, तेदेखील आपण सर्व सातारकर यशस्वी करून दाखवू,’’ असा निर्धार सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.‘‘साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू कला मंदिरची इमारत पाडून त्या जागी नवे सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात येईल,’’ अशी घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या वतीने सातारा येथे शाहू स्टेडियम येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. हे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योगदान दिलेल्या साहित्य संमेलन समितीच्या सदस्यांना व विविध मान्यवरांना प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा रविवारी हॉटेल सुरूबन येथे पार पडला. यावेळी शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शिवेंद्रराजे म्हणाले, ‘‘साताऱ्यात साहित्य संमेलन व्हावे यासाठी गेली १५ वर्षे आम्ही प्रयत्न करीत होतो. सातत्याने त्यासाठी पाठपुरावाही करण्याचे काम आम्ही केले. माझे वडील कै. अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांच्या प्रयत्नातून १९९३ मध्ये साताऱ्यात साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर सातारा शहराला हा बहुमान मिळाला नव्हता. वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी माझा प्रयत्न होता. मसापचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्याकडे आम्ही संमेलनासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. अखेर संमेलन साताऱ्याला आले आणि विनोद कुलकर्णी यांच्यासह त्यांचे सर्वच सहकारी कामाला लागले. अत्यंत उत्तम नियोजन करून सर्व सातारकरांच्या सहकार्याने हे संमेलन यशस्वी झाले. हे श्रेय माझे किंवा फक्त विनोद कुलकर्णी यांचे नाही, तर ते सर्व सातारकरांचे आहे. येणाऱ्या काळातही साहित्य संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील. साहित्य संमेलनानंतर नाट्य संमेलन साताऱ्यात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. साताऱ्यात सुसज्ज, वातानूकुलित असे नवे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. शाहू कलामंदिरची इमारत पाडून नवे आधुनिक नाट्यगृह बांधण्यात येईल. तेथे नाटक आणि इतर कार्यक्रमांसाठीच्या सर्व सोयीसुविधा असतील, कॅफेटेरिया असेल. या नाट्यगृहासाठी लवकरच हालचाली सुरू करण्यात येतील.’’
हजारो जणांचे सहकार्य
प्रास्ताविकामध्ये विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाच्या स्वप्नाचा पाठलाग आम्ही यशस्वी केला. हजारो जणांचे हात लागल्याने संमेलन यशस्वी झाले. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता आयोजित करण्यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध समित्यांमधील सदस्य, त्यांचे प्रमुख यांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली आणि त्यामुळेच साताऱ्याच्या इतिहासात एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची नोंद झाली. येणाऱ्या काळात विविध शहरांच्या ‘लिटरेचर फेस्टिव्हल’च्या धर्तीवर साताऱ्यातही काही साहित्यांचे महोत्सव करण्याची इच्छा आहे. संमेलनाप्रमाणे हे महोत्सवही यशस्वी होतील. संमेलनासाठी काम करणाऱ्या सर्व हातांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’
सुरुवातीला साहित्य संमेलनातील विविध समित्यांच्या प्रमुखांनी आपले मनोगत मांडले. नगरसेवक अविनाश कदम, मसापचे नंदकुमार सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

