गरम वरणाच्या पातेल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर
चुलत बहिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या एका 3 वर्षांच्या चिमुकल्याचा गरम वरणाच्या पातेल्यात पडून मृत्यू झाला. संभाजीनगरच्या वाळूज परिसरात ही घटना घडली आहे. वंश योगेश हरकळ (3 वर्षे) असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. तो त्याच्या चुलत बहिणीच्या वाढदिवसासाठी पालकांसह छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरात गेला होता. या ठिकाणी त्यांना वाढदिवस आणि जेवणाचे निमंत्रण होते. मात्र, हा कार्यक्रम वंशसाठी शेवटचा ठरला. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आलेल्या पाहुण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गरम वरणाच्या पातेल्यात पडून वंशचा मृत्यू झाला.
खेळत असताना तो घरातील पलंगावर चढण्याचा प्रयत्न करत होता. तो पलंगाजवळ ठेवलेल्या गरम वरणाच्या पातेल्यावर पाय ठेवून पलंगावर चढण्याचा प्रयत्न करत असताना पातेल्यावरील झाकण सरकले आणि वंश थेट त्या पातेल्यात पडला. पातेल्यातील वरण हे गरम असल्याने वंश गंभीररित्या भाजला गेला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचार सुरु असताना वंशची प्राणज्योत मालावली. दरम्यान धक्कादयक अशा या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी वाळूज पोलिस स्टेशनला अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

