साताऱ्यात रविवारी ‘शिवराज्याभिषेक’
सातारकरांचे नाटक उलगडणार छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग
साताराः शिवराज्याभिषेक हा मराठी जनतेचा स्वाभिमानबिंदू. रयतेच्या राजाचे मंचकारोहण होत असताना छत्रपतींच्या मनात उमटलेले भावतरंग दाखविणारा आगळावेगळा नाट्यप्रयोग रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शाहू कलामंदिरात होत आहे. सातारच्या २५ हून अधिक रंगकर्मींचा संच हे भव्य नाटक सादर करणार आहे.
सातारचे आघाडीचे रंगकर्मी अमित देशमुख यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शिवकाळ उभा करण्याचे आणि इतिहासाचा वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे. छत्रपती शिवरायांवर रयतेचे एवढे उत्कट प्रेम का होते? त्यांचे सवंगडी त्यांच्यासाठी प्राण त्यागण्यास इतक्या सहजपणे का तयार होत असत? स्वराज्यासाठी माताभगिनी आपले सर्वस्व का ओवाळून टाकत होत्या? शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात असे कोणते गुण होते? या प्रश्नांची उत्तरे शोधून ती प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न श्री. देशमुख यांनी केला आहे.
हरहुन्नरी अभिनेते प्रसाद देवळेकर यांनी छत्रपती शिवरायांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. आपल्या सवंगड्यांना जीव लावणारे, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणारे, प्रसंगी कर्तव्यकठोर आणि धीरोदात्त, पराक्रमी तितकेच संवेदनशील छत्रपती आपल्या अभिनयातून उलगडण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.
गजानन वाडेकर यांनी संगीताची, हेरंब जोशी-मंदार माटे यांनी नेपथ्याची तर प्रशांत इंगवले यांनी रंगभूषा-वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. राजेश नारकर, कल्याण राक्षे यांनी निर्मितीसाठी सहकार्य केले आहे. पुष्पा कदम, कुलदीप मोहिते, नीरज शाहू, अजीम पटेल, प्रथमेश देशपांडे, रवीना गोगावले, महेश चव्हाण, राजीव मुळ्ये, जमीर आत्तार, वैभव उबाळे, आदेश कुलकर्णी, पार्थ वंजारी, पुष्कर दळवी, ओम शिंदे, क्रिश उधाणी हे सातारकर रंगकर्मी या नाटकात भूमिका करत आहेत.
छायाचित्र : छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत प्रसाद देवळेकर

