मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला
अमित शाहांनी करून दिली एकनाथ शिंदेंना जाणीव
मुंबई
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशन केलेले विधान चर्चेत आले आहे. अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यागाची आठवण करुन दिली. ‘मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला,आता तुम्ही त्याचा विचार करा ,’ असा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे.
“देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल ही तीनच महत्वाची पदे आहेत. गृहमंत्रीपदासह सर्व पदे फक्त काम होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे आता तुम्ही जागावाटपात मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं” असे अमित शहा म्हणाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आम्ही तुमच्यासाठी त्याग केला, आता तुम्ही मित्रपक्षासाठी त्याग करा, असं शहांनी शिंदेंना सुचवले आहे.
भाजप नेते अमित शाहांनी स्वतः जागावाटपामध्ये सक्रिय भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिंदेंकडे आहे, त्यामुळे मित्रपक्षांना त्यांनी जास्तीत जास्त जागा द्याव्यात असा आग्रह भाजपकडून केला जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमित शाह यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला किती जागा मिळणार? शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिलं जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत

