चेन्नई सामन्यात अश्विनचे शतक
जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर,बांगलादेशला रडवले
चेन्नई
पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीने भारतीय संघाला सावरले.या दोघांनी १९४ धावांची नाबाद भागीदारी केलीच शिवाय अश्विनने नाबाद शतक ठोकले तर जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर आहे या दोघांनी बांगलादेशला अक्षरशः रडवले
या सामन्यात यशस्वी जैस्वाल वगळता भारताच्या एकाही आघाडीच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६-६ धावा करुन तंबूत परतले. तर शुबमन गिलला खाते देखील उघडता आले नाही. रिषभ पंतने ३९ धावांची खेळी केली . त्यानंतर अश्विन आणि जडेजा यांनी चांगली भागीदारी नोंदवत पहिल्या दिवसअखेर पाहुण्या संघाला सातव्या बळीसाठी तरसवले. भारताने पहिल्या दिवसअखेर ८० षटकांत ६ बाद ३३९ धावा केल्या.
टीम इंडियाकडून आर अश्विनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने २ षटकार आणि १० षटकारांच्या मदतीने ११२ चेंडूत नाबाद १०२ धावा कुटल्या. याशिवाय रवींद्र जडेजा ८६ धावांसह खेळपट्टीवर टिकून आहे. यशस्वी जैस्वाल (५६) धावा करुन बाद झाला. तर लोकेश राहुल (१६) धावा करुन मेहदी हसनचा शिकार झाला. खरे तर अश्विन आणि जडेजा यांच्या संयमी खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ४२.२ षटकांत भारताची धावसंख्या ६ बाद १४४ अशी होती. संघ अडचणीत असताना अश्विनने शतकी खेळी करुन पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला.
भारताचे माजी खेळाडू अश्विन आणि जडेजाचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सौरव गांगुली यांनी देखील या जोडीच्या खेळीला दाद देताना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेचा दाखला दिला. आर अश्विनने चांगली खेळी केली. त्यानंतर जडेजाने देखील डाव सावरला. केवळ धावाच नाही तर फलंदाजीचा दर्जाही उच्च दर्जाचा होता. बांगलादेशच्या एका अतिशय चांगल्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध ते टिकून राहिले. बांगलादेशने पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये पराभूत केले यात आश्चर्य नाही, असे सौरव गांगुली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले. एकूणच बांगलादेशच्या घातक गोलंदाजीविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नसल्याचे त्यांनी नमूद केले.