आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचाच
बाळासाहेब थोरातांच्या दाव्याने आघाडीत खळबळ
मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेत नेतेमंडळी उपस्थित होती.यावेळी नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 101 टक्के महाविकास आघाडीचा आणि तोही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे.
त्यांच्या या दाव्यामुळे आता आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण एकीकडे ठाकरे गटाने काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आपला मुख्यमंत्री चेहरा घोषित करण्याची मागणी केलेली असताना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात असे वक्तव्य करत असल्याने वादाची ठिणदगी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत. त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल. त्यातही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगले काम करण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, मला 100 टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल.

