यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस
भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला अंदाज
नवी दिल्ली
यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवलाआहे.भारतीय हवामान विभागानं यंदाच्या वर्षासाठीचा मान्सूनविषयीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केलाआहे.त्यानुसार जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भाग तसंच लडाखचा परिसर वगळता देशातील इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.महाराष्ट्रात जून 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी यापेक्षाही कमी पाऊस पडू शकतो.तर काही ठिकाणी सरासरीएवढा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असंही हवामानविभागानं तयार जाहीर केलेल्या नकाशातून दिसून येतं.
हवामानाचा हा अंदाज संपूर्ण मोसमासाठीचा आणि संपूर्ण देशभरासाठीचा आहे, असं हवामान तज्ज्ञ स्पष्ट करतात. पुढच्या काहीआठवड्यांतील निरीक्षणांनी आणखी अचूक अंदाज वर्तवणं शक्य होतं.यंदा मान्सूनचं आगमन कधी अपेक्षित आहे, याविषयीचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज साधारणपणे मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवला जातो. तर मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनच्या चार महिन्यांसाठीचं भाकित जाहीर केलं जातं.मग हा आता वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज काय सांगतो? तर दीर्घकालीन अंदाज केवळ एकूण किती पाऊस पडू शकतो आणि कुठेजास्त पावसाची शक्यता आहे, याचं ढोबळ चित्र दर्शवतो.
मात्र त्या पावसाचं वितरण कसं असेल, किती दिवस आणि कसा पाऊस पडेल, हे चित्र या अंदाजावरून निश्चित सांगता येत नाही.ते स्पष्ट होण्यासाठी आणखी निरीक्षणं करावी लागतात म्हणजे काही आठवडे वाट पाहावी लागू शकते.
दरवर्षी उन्हाळ्यात भारताच्या मुख्य भूमीचं तापमान वाढत जातं, त्यातून वाऱ्यांची दिशा बदलते आणि मान्सूनची निर्मिती होते.पण मान्सून येण्याआधीच्या काळातल्या या उष्णतेच्या लाटांची तीव्रता यंदा जास्त जाणवेल अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.दरवर्षी साधारण मे महिन्याच्या मध्यापर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मोसमी वारे वाहू लागतात.त्यानंतर 1 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होतो, 10 जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचतोआणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून माघार घेतो.त्यामुळेच शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी हा नैऋत्य मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा ठरतो.

