पत्रकारितेतील मानदंड:श्रीकांत कात्रे


विशेष लेख /शरद महाजनी

पत्रकारितेतील तब्बल तीन तपांची देदीप्यमान कारकीर्द ,जो एक आदर्श वस्तुपाठ म्हणून सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा बहुमान मिळवणारा माझा माध्यम क्षेत्रातील सन्मित्र श्रीकांत कात्रे याचा एकसष्ठी सोहळा साजरा होत आहे.त्याचे औचित्य साधून रविवार १ सप्टेंबर रोजी ‘प्रकाशरेषा’ या त्याने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे,हा भाग्ययोग म्हणावा लागेल.त्यानिमित्ताने आठवणींचा उजाळा

Advertisement

 


त्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे,सप्तरंगी इंद्रधनुष्य त्यावर रेखाटावे असा!कारण पत्रकार,माणूस,मित्र असे त्याचे विलोभनीय व्यक्तिमत्व आहे.तो अजातशत्रू आहे. साधेपणा, सच्चेपणा, विनम्रता त्याच्या रक्तात भिनली आहे.त्याचा सात्विक,सोज्वळ,शांत पण प्रसन्न चेहरा जरी नजरेसमोर आला तरी सारे त्याच्यापुढे आदराने झुकतात.ही किमया त्याच्या विधायक पत्रकारितेची,त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची.माध्यम क्षेत्रात एवढी उत्तुंग झेप घेऊन सुध्दा त्याचे पाय जमिनीवर आहेत. कर्तव्य,जबाबदारीचे भान राखून त्याने या क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी हा मानबिंदू ठरावा.
दहिवडीसारख्या एका छोट्या गावात राहून वार्ताहर म्हणून त्याने माध्यम क्षेत्रात श्री गणेशा केला. लेखणीशी इमान राखून त्याने केलेले विविध विषयांवरील प्रभावी लेखन ,त्यामागे असणारी त्याची अभ्यासू वृत्ती,विचारांची पक्की बैठक,साधना प्रतिबिंबित होते. राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी लाखमोलाची आहे.त्याच्या लेखणीला जशी धार आहे, तेवढेच हळवेपणही आहे. अन्यायाविरुद्ध आसूड ओढणारे लेखन त्याने जेवढे परखडपणे केले.तेवढेच प्रभावी लेखन सामाजिक जाणिवा जपताना केले.एखादा प्रश्न तडीस नेताना त्याची लेखणी जशी अंकुश भासावा अशी ठरली,तशीच ती साहित्य,कला क्षेत्रात पण भावना जपणारी ठरली.
पत्रकार म्हणून त्याची कारकीर्द अलौकिक आहे.पण ती करताना त्याने मैत्र, मैत्री पण जपली.एक उत्तम सहकारी,मार्गदर्शक म्हणून तो सर्वांसाठी आपला माणूस म्हणून ओळखला जातो.माध्यम क्षेत्रात जरी जीवघेणी स्पर्धा असली तरी ती निकोप कशी राहील याचे धडे त्याने विचार,कृतीतून दिले.एक सुस्वभावी माणूस म्हणून त्याने समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे.त्यामुळेच इतका मोठा परिवार त्याने आपलासा केला आहे.अशा सहयोगी मित्राबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा योग जुळून आला नाही.पण अनेक प्रसंगी एकत्र येण्याचे भाग्य मात्र लाभले.त्याची काम करण्याची पद्धत,वार्तांकन करताना त्याचे अचूक टिपण करण्याची त्याची हतोटी मी जवळून पाहिली आहे.त्यामुळे वेगळ्या दैनिकात कार्यरत असूनही त्याच्या विषयी असणारा आदर,प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कायम राहिला.त्याच्या लेखनाला खुली दाद देताना जेवढा आनंद मिळाला,तेवढाच त्याची दाद मिळवताना पण.
मला आठवते,एखादी महत्त्वाची बातमी लिहितानाचे त्याचे वेगळेपण.त्यामुळे आपण लिहिलेली तीच बातमी जेव्हा आपल्या दैनिकात प्रकाशित होत असे,त्याचे कुतूहल जेवढे नसे,तेवढी श्रीकांतने काय लिहिले,कसे लिहिले आहे ते पाहण्यात असे.खूपदा आपली बातमी चांगली असली तरी त्याने लिहिलेली बातमी अधिक चांगली, परीणामकारक वाटत असे.अशा वेळी त्याचा खूपदा हेवा वाटे,पण त्यात असूया नसे.पत्रकारितेत जे मी अनुभवले,त्यातला हा अनुभव खूप काही सांगून गेला.
जवळपास एकाच कालावधीत पत्रकार म्हणून काम करताना सहयोगी पत्रकार म्हणून अनुभवलेले ते आनंद क्षण पुन्हा आठवताना तेवढाच आनंद मिळावा यातच सर्व काही आले.त्याच्या पत्रकारितेचा सन्मान पुरस्कारांच्या रुपात त्याला मिळाला. मान सन्मान, आदर मिळवणारा हा मित्र अजून जोमाने,निष्ठेने लेखणी चालवतो आहे.ते अक्षर धन असेच अक्षय राहो,आरोग्य पूर्ण आयुष्याचे वरदान त्याला लाभो,या शुभेच्छा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!