शिवरायांची माफी मागतो:नरेंद्र मोदी
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत
मुंबई
वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी त्यांची माफी मागतो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी क्षमायाचना केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होता. पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. काही जण सावरकर यांना नावं ठेवतात, त्यांनी माफी मागितली का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर होते. सकाळी अकराला मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला त्यांनी भेट दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पालघरला येत सिडको ग्राउंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन केले.
