शास्त्री महाविद्यालयात कविता माझी सखी
मराठी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
सातारा
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे मराठी विभागामार्फत व महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, शाखा – सातारा यांच्या वतीने “कविता माझी सखी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन व महाविद्यालयातील नवोदित कवींच्या स्वरचित कवितांचे संमेलन पार पडले. या कार्यक्रमामध्ये कु. तेजश्री रमेश बर्गे, कु. काजल वाघमळे या विद्यार्थिनींनी आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, शासकीय इंजीनियरिंग महाविद्यालय जळगाव प्रा. डॉ. श्रीकांत तारे आणि प्रसिद्ध कवयित्री सौ. शिल्पा चिटणीस उपस्थित होत्या.
या मान्यवरांचा मराठी कवितांचा खळखळवून हसविणारा, सोबत अंतर्मुख करायला लावणारा, सुखदुःखाला प्रवाहित करणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कवितांमध्ये अत्यंत नर्म विनोदी, हृदयस्पर्शी, मानवी भावभावनांचे तरलचित्रण करणाऱ्या कविता, पावसाच्या, आईच्या विरहाच्या कविता तसेच काही प्रेमकविता यांचे सादरीकरण करण्यात आले. काव्यगर्भ शैलीतील लेखन त्यातील शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य व भावसौंदर्य यांचा नेमकेपणा विद्यार्थ्यांना लक्षात यावा हा हेतू या पाठीमागे होता. विद्यार्थ्यांच्या काव्यवाचन व काव्यगायन या क्षमतांचा विकास व्हावा या दृष्टीने कवितांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मयाचे उत्तम ज्ञान मिळण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे तसेच स्वतःला चांगले साहित्यिक होता यावे यादृष्टीने त्यांना महाविद्यालयीन वयातच असे अनुभव मिळावेत.” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक तवर सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कविता, काव्यवाचन आणि या क्षेत्रातील संधी याबाबत ही माहिती दिली. तसेच स्वरचित कविता सादर केली. प्रा.डाॅ. वामन सरगर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले तर डाॅ. दयानंद कराळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
