धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला
मुंबई
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती. अखेर याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.
धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे
राजीनामा मी स्वीकारला आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतके दिवस कोणाची वाट बघत होतात?- जितेंद्र आव्हाड
तुम्हाला माहिती होती आणि फोटो सरकारकडे होते तर ते इतके दिवस का थांबले?, कोणाची वाट तुम्ही बघत होता?,दबाव असेल किंवा काही असेल राजीनामा घेण्यासंदर्भात भूमिका उशिरा का घेतली?, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन देखील केले.
खरंतर उचलून फेकायला हवं होतं- अंजली दमानिया
आज राज्य सरकारनं राज्यावर मोठे उपकार केले आहेत. खरंतर यांना उचलून फेकायला हवं होतं, असं समाजसेविका अंजली दमानिया म्हणाल्या. काल समोर आलेले फोटो, त्यात काय आहे हे संपूर्ण राज्याला माहिती होतं. तरी तीन महिने लागतात?, कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांना माहिती होती, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
आरोपींना भरचौकात फाशी द्यायला हवी- आदित्य ठाकरे
धनंजय मुंडेंनी राजिनामा दिला आहे. मात्र हे सरकारचं बरखस्त करायला हवं. राज्यात महिला मुली यांचयावरील अत्याचार वाढत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आम्ही नागपूरात राजीनाम्याची मागणी केली. आम्ही तर करतच होतो मात्र भाजपचे नमिता मुंदडा व सुरेश धस यांनीही केले. मात्र मुख्यमंत्र्यांचे हात बांधले गेले होते. काल जे भयानक फोटो आले कुटुंबियांची अवस्था काय झाली असेल ते पाहून आम्हीही स्वत: हादरून गेलो. फक्त राजीनाम्याची कारवाई नको तर चार्जशिटमध्येही नाव हवं. मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करायला हवी होती. बीडमधील परिस्थिती पाहून सरकार बरखास्त व्हायला हवं. या आरोपींना भरचौकात फाशी द्यायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
न्याय नक्कीच होतो- सुरेश धस
देवाची काठी लागत नाही, पण न्याय नक्कीच होतो, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी धनंजय देशमुखांच्या राजीनाम्यावर दिली. तसेच राजीनामा देऊन थांबणार नाही. खंडणीमुळे हे सगळं घडलाय याची बैठक सातपुडा त्यांच्या बंगल्यावर झाली. सगळयांचा सीडीआर चेक करावा. काल जे फोटो समोर आले, ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. भाजपचा बूथ प्रमुख संतोष देशमुख होता त्याला न्याय मिळाला पाहिजे. कोण काय म्हणत मला काही घेणं देणं नाही, असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले.
हा राजीनामा नाही, हकालपट्टी- करुणा शर्मा
धनंजय मुंडेंचा हा राजीनामा नाही, तर हकालपट्टी आहे. तीन महिन्यांनी का होईना राजीनामा झालाय. या माणसाला मंत्रापदाचीही शपथ देऊ नका हे मी सांगत होते, असं करुणा शर्मा म्हणाल्या

