‘ज्योतिर्मय दीपावली – २६’ अंकाचा रविवारी प्रकाशन सोहळा
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा व ज्योतिर्मय प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्योतिर्मय दीपावली – २६’ अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता शनिवार पेठ येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, सातारा येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रकाशन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन आणि प्रसिद्ध साहित्यिक श्री. शिरीष चिटणीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावर्षीच्या दीपावली अंकात सातारच्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या लेखनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ॲड. शुभदा कुलकर्णी, वैशाली महाडिक, रंजना सानप, स्नेहल यादव, सुरेखा शेजवळ, दीपाली गुरव, विजया देशपांडे आणि प्रदीप केळुस्कर या सातारच्या साहित्यिकांचा विशेष सहभाग आहे. या दिमाखदार सोहळ्याचे औचित्य साधून नवोदित कवी व लेखकांचा विशेष सत्कार देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक विनायक भोसले (दीपलक्ष्मी पतसंस्था, सातारा) आणि संजय व्यापारी (संपादक, ज्योतिर्मय, पुणे) हे असून, त्यांनी साताऱ्यातील तमाम रसिक वाचक, साहित्यिक आणि नागरिकांना या प्रकाशन सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

