बदल हा जीवनाचा स्थायी भाव:मोहन दाते


युनायटेड वेस्टर्न बँक व आयडीबीआय सेवानिवृत्त संघटनेचे अधिवेशन संपन्न

सातारा
“बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे. सर्वच क्षेत्रात याचा परिणाम दिसतो. त्याच अनुषंगाने आपण आपले आचरण ठेवावे” असे उद्गार सोलापूर येथील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या सेवानिवृत्त संघटनेच्या अधिवेशनात काढले. मोहन दाते यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
सोलापूर येथे पॅलेस येथे झालेल्या अधिवेशनात उद्घाटक म्हणून श्री मोहन दाते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कै धुंडिराजशास्त्री दाते यांनी पंचांग करताना, पंचांगात जे आहे, ते आकाशात दिसले पाहिजे, हे आवर्जून सांगितले होते. त्यानुसार पंचांग हे जितके अचूक करता येईल तितके केले. पंचागात विस्तृत अशी माहिती आम्ही अनेक वेदाचार्य, ऋषीमुनी यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे अत्यंत शास्त्रशुद्ध निर्णय समाविष्ट केले. नव्या पिढीसमोर अनेक शंका उपस्थित होत होत्या, त्याची त्यांनी सविस्तर उदाहरणे दिली.
साठीच्या पुढे असलेल्या या उपस्थितांमध्ये असलेला उत्साह पाहता हे खरंच निवृत्त आहेत का ? असा देखील प्रश्न पडतो. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीसच येथे कोणीही भविष्य विचारू नये, असे स्पष्ट केले होते. नव्या पिढीला आम्ही आजी आजोबा म्हणून सर्व सहकार्य करू म्हणजे मुलांची संख्या वाढेल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष ए. के. कुलकर्णी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात संघटना निर्मितीपासूनचा आढावा घेतला
सरचिटणीस सुधाकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर, सूत्रसंचालन चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र अष्टेकर, सहसचिव नरेश बिंदू व स्थानिक प्रतिनिधी माधव मोकाशी, सहकार क्षेत्राचे प्रतिनिधी विराज टिकेकर, तसेच भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी रवी रामन हेदेखील उपस्थित होते.
या अधिवेशनासाठी देशभरातून 3०० हून संघटनेचे सदस्य उपस्थित होते. पहिल्या सत्राची सांगता ही पसायदानाने झाली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संघटनेच्या ज्या सदस्यांनी ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांचा या प्रसंगी शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रमोदराव कुलकर्णी तसेच श्री दिलीप तळवलकर यांचा समावेश आहे. सत्कारार्थीच्यावतीने श्री प्रमोदराव कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात साताऱ्यातील सेवानिवृत्त सहकाऱ्यांनी माऊली माऊली हा वारकरी डान्स सादर केला, त्यांनी उपस्थित सर्व जण भारावून गेले. त्यानंतर विविध गायकांनी कराओकेवर आपली गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सुसंवाद सातारा ग्रुपचे संघटक शशिकांत पंडित यांनी केले.‌ तर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक दिक्षित यांनी केले.‌

Advertisement

सोलापूरचे डी एल कुलकर्णी, गुरुराज देशपांडे व सर्व माजी सहकाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन हे अधिवेशन यशस्वी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!