परफ्युममुळे आकर्षित झाल्या नाहीत मुली
ग्राहकाने कंपनीला खेचलं कोर्टात
मुंबई
जाहिरात पाहून एका तरुणाने परफ्युम खरेदी केला; पण जाहिरातीप्रमाणे त्याला रिझल्ट मिळाले नाहीत.म्हणून तो कोर्टात गेला आणि दाद मागितली कंपनीने आपल्या प्रॉडक्टची जाहिरात केली आणि त्या जाहिरातीच्या प्रॉडक्ट डिटेलमध्ये अतिशयोक्ती असलेले दावे केले होते. एक तरुण या जाहिरातीमुळे इतका प्रभावित झाला की त्याने प्रॉडक्ट विकत घेतलं. तब्बल सात वर्षं त्याचा वापर केला; पण त्याला जाहिरातीप्रमाणे रिझल्ट मिळाले नाहीत. त्यामुळे निराश होऊन तो कोर्टात गेला. त्याने कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला व न्याय मागितला. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल पोस्ट लिहून माहिती दिली आहे.
हर्ष गोयंका यांनी पोस्टमध्ये प्रॉडक्टची जाहिरात दाखवताना लिहिलं आहे, की कंपनीने फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करून एका ग्राहकाने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविरोधात (एचयूएल) न्यायालयात खटला दाखल केला आहे. वैभव बेदी असं तक्रार करणाऱ्याचं नाव आहे. ही तक्रार कंपनीच्या एक्स (AXE) या प्रॉडक्टविरोधात आहे. याची जाहिरात पाहून वैभवने हे प्रॉडक्ट खरेदी केलं होतं.जाहिरातीत या प्रॉडक्टची वैशिष्ट्यं सांगितली होती. ती पाहून वैभव खूप प्रभावित झाला. हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर मुली त्या सुगंधाने आकर्षित होतील, असं जाहिरातीत म्हटलं होतं. त्यामुळे वैभवने जवळपास सात वर्षं प्रॉडक्ट वापरलं. परंतु त्याला कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. हर्ष गोयंका यांनी या प्रकरणावर उपरोधिक पोस्ट केली आहे.
हर्ष गोयंका यांची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक एक्स युझर्स या पोस्टवर कमेंट करत आहेत. लाखो जणांनी ही पोस्ट लाइक केली आहे. एका युझरने लिहिलं, ‘हे खूप चांगलं झालं. देवाचे आभार मानतो, की कोणी तरी सुरुवात केली. मी 10 वर्षांपासून हे प्रॉडक्ट वापरत आहे. फक्त सुगंध छान आहे.’
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक केल्यास या कायद्यांतर्गत त्यांना शिक्षा होऊ शकते. तसंच दंडही आकारला जाऊ शकतो.
