बेपत्ता आजोबा दिसले सरकारी जाहिरातीत
महाराष्ट्र सरकारची तीर्थक्षेत्र पर्यटनाची जाहिरात
मुंबई
जवळपास तीन वर्षांपासून बेपत्ता असलेलं एक आजोबा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीत दिसल्याने कुटूंबियांना आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसला भरत तांबे यांचे वडील ज्ञानेश्वर तांबे गेल्या जवळपास तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. तांबे कुटुंबीय त्यांच्या परीने सर्वत्र शोध घेत होते. मात्र, ज्ञानेश्वर तांबेंचा काहीच पत्ता तांबे कुटुंबीयांना लागत नव्हता.आणि हे ज्ञानेश्वर तांबे दिसले, ते थेट महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीवरच. ही जाहिरात होती तीर्थक्षेत्र पर्यटनाची.
या योजनेचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. यातील एका जाहिरातीवर ज्ञानेश्वर तांबे यांचं छायाचित्र छापण्यात आलंय.ही जाहिरात इन्स्टाग्रामवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आली होती. हे तांबे कुटुंबीयांच्या परिचयातील एका व्यक्तीनं पाहिली आणि ती तांबे कुटुंबीयांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
भरत तांबे म्हणाले , “आमच्या वडिलांचं जाहिरातीत वापरण्यात आलेला फोटो नवा आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी मागच्या काही दिवसातच फोटो काढण्यात आला असावा, असं वाटतंय. याचा अर्थ ते सुखरुप आहेत, अशी आम्हाला आशा आहे. त्यांचा शोध लागावा आणि ते परत यावेत, असं आम्हाला वाटतंय.”
ज्ञानेश्वर तांबेंसंबंधी बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भरत तांबे यांच्याशी संपर्क साधला आणि ज्ञानेश्वर तांबेंच्या शोधासाठी विशेष पथकं पाठवल्याची माहिती त्यांनी भरत तांबेंना दिली.
ज्ञानेश्वर तांबे हे सध्या अंदाजे 65 ते 68 वर्षे वयाचे आहेत ज्ञानेश्वर तांबे हे वर्षानुवर्षे वारीत चालतात.ज्ञानेश्वर तांबेंना भरत तांबे आणि सचिन तांबे अशी दोन मुलं आहेत. शिरूरमधील वरूडे या गावीच हे कुटुंब राहतं. ज्वारी-बाजारी अशा पिकांच्या शेतीवर या कुटुंबाचा उदर्निवाह चालतो.
