वाघनखे भारतात दाखल
१९ जुलैला होणार सातारा येथे भव्य कार्यक्रम
मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाघ नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनख भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर ही वाखनखे भारतात आली आहेत.
कस्टम विभागाचे अधिकारी आणि सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात लंडनहून आलेली वाघ नखे साताऱ्याकडे नेली जात आहेत. मुंबई विमानतळावर सकाळी १० वाजता ही वाघनखे दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाघ नखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही वाघ नखे साताऱ्याकडे रवाना झाली आहेत.
लंडनहून आणण्यात आलेली वाख नखे शाहूनगरी सातारा येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या ऐतिहासिक घटनेसाठी सातारा जिल्ह्यात मोठी तयारी करण्यात आली आहे. यासाठी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तो दिमाखदार आणि राजेशाही थाटात केला जाणार आहे. वाघनख्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही वाघ नखे सात महिने शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना वाघनखे निशुल्क पाहता येतील. तर इतरांना १० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. याची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी असणार आहे.
