विद्यार्थ्यांना सजीव नैसर्गिक वारशाचा अनोखा अनुभव


जागतिक वारसा सप्ताह: महादरे कंझर्व्हेशन रिझर्व्हला भेट
सातारा
जागतिक वारसा सप्ताह, 2025 च्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना सजीव नैसर्गिक वारशाचा अनोखा अनुभव देण्यात आला. साधना इंग्लिश मीडियम स्कूल आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (YCA) येथील विद्यार्थ्यांनी महादरे कंझर्व्हेशन रिझर्व्ह येथे पर्यावरण जनजागृती सत्रासाठी भेट दिली. हा उपक्रम यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (IIA) सातारा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

Advertisement

महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष व प्रसिद्ध निसर्गसंवर्धन तज्ज्ञ श्री. सुनील भोईटे व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना रिझर्व्हमधील समृद्ध जैवविविधता, स्थानिक वनस्पती आणि परस्परावलंबी परिसंस्था याबाबत सखोल मार्गदर्शन केले. निसर्गभ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांनी या परिसरातील सजीव नैसर्गिक वारशाचे निरीक्षण केले आणि निसर्गातील सर्व घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेतले.
या सत्रात वारसा म्हणजे केवळ वास्तु आणि स्मारके नसून निसर्गही एक जिवंत वारसा आहे, यावर भर देण्यात आला.काही दगडात कोरलेला असतो, तर काही जंगलाच्या शांत कुशीत जिवंत असतो, असे भावनिक मनोगत श्री. सुनील भोईटे यांनी व्यक्त केले. या अनुभवाने विद्यार्थी अंतर्मुख झाले. एका विद्यार्थ्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आजच सत्र म्हणजे निसर्गाच्या वारशाचं अनोखं दर्शन—जणू निसर्ग आमच्याशी बोलत होता.हा उपक्रम यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सागरे आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य आर्कि. सुहास तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच विश्वस्त आर्कि. स्वराली सागरे आणि IIA सातारा सेंटरचे अध्यक्ष आर्कि. विपुल सालवंकर यांची उपस्थिती कार्यक्रमासाठी प्रेरणादायी ठरली.

कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरणीय धोके, संवर्धन पद्धती आणि शैक्षणिक संस्था पर्यावरण संरक्षणासाठी कसा हातभार लावू शकतात यावर चर्चा झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरला आणि पिढ्यांमध्ये निसर्गवारशाबद्दल जागृती निर्माण झाली.जागतिक वारसा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी एक महत्त्वाची शिकवण समोर आली वारसा म्हणजे केवळ आपण जतन केलेली वास्तुकला नाही, तर निसर्गातील परिसंस्था जपण्याची आपली जबाबदारीही आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!