मी श्वानाला माणूस म्हणालो आणि त्याला राग आला.


यशेंद्र क्षीरसागर यांच्या कवितेने वाईकरांची जिंकली मने

सातारा

मी श्वानाला माणूस म्हणालो
आणि त्याला राग आला.
रागात म्हणाला, आम्हाला
माणूस म्हणू नका .
आमची जमात अजून तरी,
तुमच्या इतकी घसरलेली नाही

येथील कवी, साहित्यिक, वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी सादर केलेल्या सामाजिक आशयाच्या प्रभावी कवितेने वाईकरांची मने जिंकली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाई शाखेचा पुनरुज्जीवन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला .त्यावेळी आयोजित काव्य संमेलनात श्री.क्षीरसागर यांनी ” मी श्वानाला माणूस म्हणालो आणि त्याला राग आला”,ही आशयसंपन्न वास्तवदर्शी कविता सादर केली… पारंपरिक वारकरी वेषात क्षीरसागर यांनी सादर केलेल्या या कवितेच्या वेगळ्या मांडणीने आणि सामाजिक अर्थामुळे या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. यावेळी मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी ,अरुण आदलिंगे, सुनीताराजे पवार, अरुण म्हात्रे, लक्ष्मीकांत रांजणे, अजित क्षीरसागर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुक्तचछंद कवितेचा महाराष्ट्राला खूप मोठा वारसा आहे. या अर्थपूर्ण कवितेच्या धाटणीमध्ये बसणारी ही कविता आहे .आज माणुसकीला घरघर लागली आहे. भौतिक प्रगतीच्या मागे माणूस जिवाच्या आकांताने पळत आहे. स्वार्थाला आपलेसे करून अध्यात्माला तो विसरला आहे.या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक आणि काहीशी प्रहसनात्मक असलेली ही कविता उपस्थितांना वास्तवतेची जाणीव करून देण्यात यशस्वी ठरली. एखाद्या श्वानाला सुद्धा आता माणसाची उपमा नको आहे, इतका माणूस घसरलेला आहे. असा आशय या कवितेत आहे.

Advertisement

कपडा घालत नसलो
म्हणून काय झालं?
आम्ही इज्जत सोडलेली नाही
पांढरे शुभ्र कपड्यातले बोके
तुमच्या जमातीत आहेत ना
आम्ही तसे नाही….

अशा परखड भाषेत माणसाला श्वान उत्तर देतो. जेव्हा माणूस श्वानाला विचारतो की,” तू किती शिकला आहेस? कुठली तरी डिग्री तुझ्याकडे आहे का?” तेव्हा तो श्वान म्हणतो-

बरं झालं नाही शिकलो,
नाहीतर हुंडा मागितला असता!
इंच इंच जमिनीसाठी,
बापाला कोर्टात खेचले असते!

मानवतेला आज जखम झाली आहे. मानवता वेदनेचा वेद गात आहे.संत, समाजसेवक, समाजसुधारक यांचा मोठा वारसा महाराष्ट्राला आहे. अशा पार्श्वभूमीवर कुठेतरी माणूस भरकटत चालला आहे. असा गर्भित इशारा या कवितेत श्री. क्षीरसागर देतात.

चल रे वाघ्या रडू नको, पाया कोणाच्या पडू नको असे आवाहन एका चित्रपटात महान कलाकार दादा कोंडके यांनी श्वानाला केले होते. असा उल्लेख करून कवितेत शेवटी ते म्हणतात-

लांबून जोरजोरात रडण्याचा
आवाज येत होता…
बहुतेक अजूनही…
वाघ्या रडत असावा!

प्रामाणिकपणा हा श्वानाच्या जातीचा मूलभूत सद्गुण मानवाच्या हातून निसटत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर ही कविता अनेकांच्या लक्षात राहणारी ठरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!