‘कारण अभ्यास, तुका म्हणे’ वचन ध्यानी ठेवा
अँबिशन अकॅडमीमध्ये यशेंद्र क्षीरसागर यांचे मार्गदर्शन
सातारा
“असाध्य ते साध्य, करिता सायास! कारण अभ्यास तुका म्हणे, हे वचन विद्यार्थ्यांनी ध्यानी ठेवावे. अभ्यासात आनंद शोधावा .यश मिळालेच पाहिजे, असा तणाव न घेता संकल्पना समजून घ्याव्यात. ज्ञान मिळवावे. विषय समजून घ्यावा. त्यातून गुणांची प्राप्ती सहजरित्या होईल”, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते साहित्यिक विद्यार्थी मार्गदर्शक यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील अँबिशन अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर ” स्वयंअध्ययन तंत्र आणि मंत्र” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संचालक माणिक कांबळे, पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले,” संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम यांच्यापासून ते महात्मा गांधी शहीद भगतसिंग ,स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महात्म्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताला महान बनवण्यात योगदान दिले. हाच धागा पुढे पकडून आपण आपले कर्तव्य म्हणून मनापासून अभ्यास करायला हवा. स्वतः सह देशाची उन्नती साधावी. अभ्यासुनी प्रकटावे असे संतांनी सांगितले आहे. तसेच ‘असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास’ असे संत तुकाराम म्हणतात. विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकल्पना समजून घ्यावी. ताण-तणाव घेऊ नये. शिक्षक हे मार्गदर्शनासाठी असतात. शिकायचे आपल्यालाच असते. त्यामुळे घरी स्वयंअध्ययन करावे. स्वतःच्या भाषेत नोट्स काढाव्यात. वारंवार वाचन करावे. वारंवार उजळणी करावी . सातत्याने लेखन करावे.हा विषय मला समजले पाहिजे अशी खूणगाठ मनाशी बांधावी. मला एवढे गुण मिळालेच पाहिजेत, असा तणाव न घेता विषय समजला पाहिजे ही भावना दृढ करावी. त्यातून भरपूर गुण आपोआप मिळत जातील.संगत चांगली ठेवून स्वभावात संयम ठेवावा. त्यामुळे मनाला शांतता लाभून अभ्यासामध्ये एकाग्रता निर्माण होईल. आपले आई-वडील समाज यांच्याकडून यांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत हे विद्यार्थ्यांनी ध्यानी ठेवावे आणि वाटचाल करा.वी यश सुलभ आहे मात्र प्रयत्न सातत्याने करावेत.”
श्री. कांबळे यांनी स्वागत केले आणि आभार मानले.
