रोहित विराटच्या पाठीशी
फायनलसाठीच विराटने धावांची सेव्हिंग केली असल्याचे वक्तव्य
गयाना :
भारतानं दमदार कामगिरी करत इंग्लंडला सेमी फायनलमध्ये पराभवाचं पाणी पाजलं. भारतानं या विजयासह टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.मात्र, किंग कोहलीची बॅट या मॅचमध्ये देखील तळपली नाही. विराट कोहली 9 धावा करुन बाद झाला. विराट कोहलीला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर गवसलेला नाही. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरूद्धच्या मॅचमधील फलंदाजी वगळता विराटला इतर मॅचमध्ये त्याच्या लौकिकाप्रमाणं फलंदाजी करता आलेली नाही. रोहित शर्माला पोस्ट मॅच प्रेझेंटशनच्या कार्यक्रमात विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारला गेला. रोहितनं किंग कोहलीला फुल सपोर्ट असल्याचं म्हटलं.
रोहित शर्मा म्हणाला की, “विराट कोहली एक क्लास खेळाडू आहे, कोणताही खेळाडू या प्रकारच्या टप्प्यातून जात असतो. आम्ही त्याचा क्लास आणि महत्त्व समजून घेतो. फॉर्म कोणतीही समस्या नाही. इंटेट म्हणजे हेतू तोच आहे. बिल्कूल मला पूर्ण विश्वास आहे. विराट कोहली पुढे मोठं काहीतरी करणार आहे. विराटनं त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी अंतिम फेरीसाठी राखून ठेवलीय”,
दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला 9 विकेटनं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुसरीकडे भारतानं इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत विजय मिळवला आहे. आता भारताकडे 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील पराभव, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील पराभव विसरुन टीम इंडियानं अंतिम फेरीत धडक दिलीय. रोहित शर्मा भारताला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
