सर्वात उंच घोडा सिकंदरचा मृत्यू
वयाच्या 9 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे
देशातील सर्वात उंच घोडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिकंदर या घोड्याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील अकोले गावात सिकंदरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.सिकंदर हा शानदार आणि हुशार घोडा होता. पंजाबमध्ये त्याचा जन्म झाला होता. निलेश अष्टेकर यांनी त्याला पंजाबमधून महाराष्ट्रात आणले होते. देशातील सर्वात उंच घोडा म्हणून सिकंदरची ओळख होती. यासह सिंकंदरच्या नावावर इतरही अनेक विक्रम होते.
‘सिकंदर’ यांच्या निधनाने अष्टेकर कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी नीलेश अष्टेकर यांनी सांगितले की, सिकंदर हा गेल्या साडेसात वर्षांपासून त्यांच्यासोबत होता. सिकंदरच्या मृत्यूने नीलेश अष्टेकर यांच्या घरावर व परिसरात शोककळा पसरल. सिकंदर हा घोडा नसून त्याच्या कुटुंबातील सदस्य होता, अशी भावना निलेश यांनी व्यक्त केली.
निलेश यांनी त्यांच्या फार्मवर नुकरा, मारवाडी, काठेवाडी अशा विविध जातींचे घोडे पाळले आहे. ‘सिकंदर’ हा त्यातला एक घोडा होता. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी त्याला पाहायला येत असत. या घोड्यासाठी एका कंपनीने तब्बल 70 लाखांची बोली लावली होती. हा घोडा प्रजननासाठी वापरला जात होता. निलेश अष्टेकर यांनी सुमारे 25 वर्षे उच्च जातीच्या घोड्यांचा अभ्यास केला. अभ्यास करून त्यांनी स्टड फार्मसाठी इंदापूर तालुक्यातील अकोले गाव निवडले. त्यांनी त्यांच्या फार्ममध्ये 69 इंच उंच घोडे ठेवण्याचा आणि उच्च दर्जाच्या वंशावळ तयार करण्याचा प्रयोग सुरू केला आहे
