भुजबळांनी सत्तेतून बाहेर पडावे
समता परिषदेच्या बैठकीत मागणी
नाशिक
छगन भुजबळ यांना लोकसभा आणि राज्यसभेवर डावलण्यात आलं. मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण करून भुजबळ आणि ओबीसींवर अन्याय होत आहे. असा सगळा अन्याय होत असताना सत्तेत राहायचं का त्यावर निर्णय घ्या, अशी भूमिका समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. छगन भुजबळ यांना कार्यकर्त्यांकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिलेला असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसले आहेत.या पार्श्वभूमीवर समता परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळांच्या राजीनाम्याचा सूर आळवण्यात आला.
जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यास छगन भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात. ओबीसींच्या आरक्षणासाठी शिवसेनेतून बाहेर पडल्याचा भुजबळांचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.समता परिषदेच्या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगे यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलं आहे. जातीनिहाय जनगणना झाली तर ओबीसी नेमके किती हे समजेल, असं भुजबळ म्हणाले आहेत