पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघातात १५ ठार
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची मागून जोरदार धडक
कोलकाता:
पश्चिम बंगाल येथे कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीने मागून जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की यामध्ये एक्स्प्रेसच्या बोगी रुळावरुन उतरल्या तर एक बोगी थेट मालगाडीच्या इंजिनवर चढली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आतापर्यंत या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याची तर २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पश्चिम बंगालमधील न्यू जलपाई गुडीजवळ सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सियालदहाहून जाणाऱ्या कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. आगरतळाहून येणारी कंचनजंगा एक्स्प्रेस नवीन जलपाई गुडी स्थानकाजवळ रंगपाणीजवळ उभी होती. दरम्यान, एका मालगाडीने मागून या गाडीला धडक दिली. अपघातानंतर दोन बोगी रुळावरून घसरल्या. यामध्ये एका बोगीला आग लागली. तर एक बोगी मालगाडीवर चढली
हा अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज लांबवर ऐकू गेला. अपघात होताच स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले आणि बोगीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सध्या गॅस कटरने बोगी कापून अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात येत आहे
