काश्मीरमध्ये ‘झिरो टेरर प्लॅन’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लष्करी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरिय बैठक
नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता केंद्रातून आता यामध्ये लक्ष घालण्यात सुरुवात करण्यात आली आहे.देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लष्करी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरिय बैठक घेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले.यावेळी अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेसण घालण्यासाठी आणि कटकारस्थानं हाणून पाडण्यासाठी इथं झिरो टेरर प्लॅन लागू करण्याचे निर्देश दिले. त्यांचे निर्देश मिळतात तातडीनं त्याची अंमलबजावणीही सुरु झाली.
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीविषयी हाती आलेली सविस्तर माहिती पराहिल्यानंतर इथं दहशतवादविरोधी मोहिम आणखी सक्तीनं राबवण्याच्या सूचना आणि संकेत शाह यांनी या बैठकीदरम्यान दिले. पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार इथं आता कठोर पावलं उचलली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. परिणामी येत्या काळात जम्मू काश्मीरमध्ये सर्वच हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असून, प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची या भागावर करडी नजर असणार आहे हे स्पष्ट होत आहे. या भागात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या कारवाईचे संकेतही मिळत आहेत.
दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक इथं शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे उपराज्य्पाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, होऊ घातलेले लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर यंत्रणेचे संचाकल तपन डेका, सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंह, बीएसएफ महासंचालक नितीन अग्रवाल, जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक आर.आर.स्वैन आणि सुरक्षा दलातील इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकार दहशतवादाशी दोन हात करत तो समुळ नष्ट करण्यासाठी तत्पर असल्याचं आश्वासक वक्तव्य अमित शाह यांनी या बैठकीदरम्यान केलं. जम्मू काश्मीरमध्ये हल्लीच झालेल्या एकाहून अधिक दहशतवादी हल्ल्यांना पाहता शाह यांनी ही उच्चस्तरीय बैठक बोलावलली जोती. जिथं त्यांनी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना आपली भूमिका स्पष्ट केली. 29 जूनपासून सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीच्या तयारीचा आढावाही शाह यांनी या बैठकीदरम्यान घेतला.
