पिंपरी चिंचवडमध्ये उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर
पुणे
लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यभरात अनेक ठिकाणी हौशी कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावून विजयाचा दावा केला आहे.पिंपरी चिंचवडमध्ये, तर थेट साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. खंडोबा माळ परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत.
सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये थेट सामना झाला आहे. सातारा लोकसभेसाठी 60 टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूने विजयाचा दावा करण्यात येत असला तरी निकाल हा चार जून रोजीच स्पष्ट होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपल्या विजयाचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उदयनराजे भोसले यांच्या विजयाचा दावा केला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उदयनराजे यांनी 1,26,528 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यांना 52 टक्के मतांसह 579,026 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. त्यांना 452,498 मते (40.48%) मिळाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही उदयनराजे या जागेवर विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 53.50 टक्के मतांसह 5,22,531 मते मिळाली. 2019 मध्येच झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
